Second Sphinx Egypt Discovery | इजिप्तमध्ये दुसर्‍या स्फिंक्सचा शोध? 
विश्वसंचार

Second Sphinx Egypt Discovery | इजिप्तमध्ये दुसर्‍या स्फिंक्सचा शोध?

जमिनीखाली दडलंय महाकाय गुपित!

पुढारी वृत्तसेवा

कैरो (इजिप्त) : इजिप्तच्या वाळवंटात हजारो वर्षांपासून उभ्या असलेल्या ग्रेट स्फिंक्सला आता त्याचा जोडीदार मिळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. अत्याधुनिक स्कॅनिंग तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधकांनी असा दावा केला आहे की, गीझाच्या पठारावर एका महाकाय डोंगरवजा ढिगार्‍याखाली दुसरा स्फिंक्स गाडला गेला असू शकतो.

ड्रीम स्टेलामधील पुराव्यानुसार स्फिंक्सच्या पुढच्या दोन पायांच्या दरम्यान असलेल्या एका प्राचीन दगडावर दोन स्फिंक्सची चित्रे कोरलेली आहेत. 3,000 वर्षांपूर्वीच्या या खुणेवरून संशोधकांचा असा अंदाज आहे की, हे स्मारक मूळतः जोडीने बांधले असावे. इटालियन संशोधक फिलिपो बिओन्डी यांनी सांगितले की, पिरॅमिडस् आणि सध्याचा स्फिंक्स यांच्या रेषेत जर आरशाप्रमाणे (मिरर इमेज) रचना पाहिली, तर बरोबर दुसर्‍या बाजूला एका उंच ढिगार्‍याखाली ही नवीन संरचना आढळली आहे. सॅटेलाईट रडार तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या प्राथमिक तपासणीत संशोधकांना 80 टक्के खात्री आहे की, तिथे काहीतरी मोठे दडलेले आहे. हा ढिगारा नैसर्गिक खडकाचा नसून घट्ट झालेल्या वाळूचा बनलेला आहे. स्कॅनिंगमध्ये जमिनीखाली अनेक उभे शाफ्टस् आणि आडवे रस्ते (पॅसेज वे) दिसून आले आहेत. ही रचना सध्याच्या स्फिंक्सच्या खाली असलेल्या रचनेशी तंतोतंत जुळते.

फिलिपो बिओन्डी यांच्या मते, हे केवळ दुसरे स्मारक नसून जमिनीखाली एक अंडरग्राऊंड मेगास्ट्रक्चर (महाकाय भूमिगत संकुल) आहे. हे संकुल संपूर्ण गीझा पठाराच्या खाली पसरलेले असू शकते. इजिप्तचे माजी पुरातत्त्व मंत्री झाही हवास यांनी यापूर्वी असे दावे फेटाळून लावले होते. मात्र, नवीन तांत्रिक पुराव्यांमुळे संशोधकांनी आता इजिप्त सरकारकडे या जागेच्या प्रत्यक्ष उत्खननासाठी परवानगी मागितली आहे. जर हे उत्खनन यशस्वी झाले, तर मानवी इतिहासातील आणि इजिप्तच्या संस्कृतीतील हा सर्वात मोठा शोध ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT