विश्वसंचार

एकमेकांमध्ये मिसळणार्‍या प्रारंभीच्या कृष्णविवरांचा शोध

Arun Patil

टोकियोः ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या काळातील एकमेकांमध्ये मिसळत असलेल्या दोन कृष्णविवरांचा आता शोध लागला आहे. ही कृष्णविवरे 'बिग बँग' नंतर केवळ 90 कोटी वर्षांनंतर बनलेल्या आकाशगंगांच्या केंद्रस्थानी आहेत. 'बिग बँग' या महाविस्फोटानंतर ब्रह्मांडाची निर्मिती झाली, असे मानले जाते. त्यामुळे ब्रह्मांडाच्या पहाटेच्या काळातील आकाशगंगांची ही केंद्रस्थाने एकमेकांमध्ये मिसळत असताना पाहण्याची संधी संशोधकांना मिळाली आहे.

'कॉस्मिक डॉन' म्हणजेच 'ब्रह्मांडीय पहाट' ही संज्ञा 'बिग बँग'नंतरच्या पहिल्या एक अब्ज वर्षांबाबत वापरली जाते. ''बिग बँग'नंतरच्या 40 कोटी वर्षांनंतरच्या काळाला 'इपोक ऑफ रिओनायझेशन' असे म्हटले जाते. अशाच सुरुवातीच्या काळातील दोन आकाशगंगांच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवरांचे हे मिलन आहे. जपानच्या एहिम युनिव्हर्सिटीतील योशिकी मात्सुओका यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, 'इपोक ऑफ रिओनायझेशन'मधील या दोन एकमेकांमध्ये विलय होणार्‍या कसार्स किंवा ब्लॅकहोल्सबाबतची माहिती यापूर्वीच मिळालेली होती; पण आता त्याची पुष्टी झाली आहे.

याबाबतच्या संशोधनाची माहिती 'द अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स' मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. कृष्णविवरांची निर्मिती ही मोठ्या तार्‍याचा मृत्यू झाल्यानंतर होत असते. त्यांची आकर्षणशक्ती इतकी तीव्र असते की त्यांच्या तडाख्यातून प्रकाशकिरणही सुटत नाही. त्यामुळे या पोकळीला 'कृष्णविवर' असे म्हटले जाते. प्रत्येक आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असा एक शक्तिशाली कृष्णविवर असतो. त्याला 'कसार' असेही म्हटले जाते. यापूर्वी 'इपोक ऑफ रिओनायझेशन'मधील सुमारे 300 कसार्सचा किंवा कृष्णविवरांचा शोध घेण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT