American historical discovery: स्मिथने नोंदवलेल्या अमेरिकेतील आदिवासी वस्त्यांचा शोध Pudhari Photo
विश्वसंचार

American historical discovery: स्मिथने नोंदवलेल्या अमेरिकेतील आदिवासी वस्त्यांचा शोध

रॅपाहॅनॉक नदीच्या किनाऱ्यावर उत्खनन करणाऱ्या पुरातत्त्वशास्त्रज्ञांना हजारो पुरावशेष सापडले आहेत

पुढारी वृत्तसेवा

वर्जिनिया : सुमारे 400 वर्षांपूर्वी, इंग्रज वसाहतवादी आणि शोधक जॉन स्मिथ याने आपल्या नोंदींमध्ये (जर्नलमध्ये) लिहिले होते की, आताच्या व्हर्जिनियामधील एका प्रमुख नदीकिनारी आदिवासींची गावे (वस्त्या) होती. मात्र, त्या गावांची नोंद असलेली ठिकाणे कालांतराने विसरली गेली आणि त्यांच्या अस्तित्वाबद्दलही शंका व्यक्त केली जात होती. आता, रॅपाहॅनॉक नदीच्या किनाऱ्यावर उत्खनन करणाऱ्या पुरातत्त्वशास्त्रज्ञांना हजारो पुरावशेष सापडले आहेत. यात मणी, मातीच्या भांड्यांचे तुकडे, दगडाची हत्यारे आणि तंबाखू पिण्याचे पाईप्स यांचा समावेश आहे. हे अवशेष जॉन स्मिथने शतकांपूर्वी वर्णन केलेल्या गावांचेच असल्याचा त्यांचा विश्वास आहे.

‌‘या अवशेषांच्या उपस्थितीमुळे मौखिक इतिहास आणि दस्तावेज या दोन्ही गोष्टींना पुष्टी मिळते, ज्यामुळे सिद्ध होते की, 1608 मध्ये कॅप्टन जॉन स्मिथने रॅपाहॅनॉक नदीचा नकाशा तयार करताना येथे अनेक आठवडे घालवले होते,‌’ असे उत्खननाचे नेतृत्व करणाऱ्या सेंट मेरी कॉलेज ऑफ मेरीलँडमधील मानववंशशास्त्राच्या प्राध्यापिका ज्युलिया किंग यांनी सांगितले. नदीचा हा महत्त्वाचा भाग उंच कड्यांनी वेढलेला आहे, ज्यामुळे वरच्या वस्तीपर्यंत पोहोचणे मर्यादित होते. या उंचीमुळे नदीच्या संपूर्ण खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसत असे.

तसेच, या जागेची माती मका पिकवण्यासाठी उत्तम होती, अशी माहिती किंग यांनी दिली. या नदीला व्हर्जिनियामध्ये मान्यता मिळालेल्या 11 मूळ अमेरिकन गटांपैकी एक असलेल्या रॅपाहॅनॉक जमातीचे नाव देण्यात आले आहे. या जमातीचे अनेक सदस्य अजूनही जवळच्या परिसरात राहतात आणि नदीकिनारी असलेली त्यांची वंशपरंपरागत जमीन परत मिळवून तिचे संरक्षण करण्याची त्यांची इच्छा असल्याचे किंग यांनी सांगितले. जॉन स्मिथ युरोपमध्ये भाडोत्री सैनिक आणि साहसी व्यक्ती म्हणून कार्यरत होता. 1608 मध्ये त्याची व्हर्जिनियातील जेम्सटाऊन वसाहतीच्या परिषदेचा अध्यक्ष म्हणून निवड झाली. (जेम्सटाऊनची स्थापना एका वर्षापूर्वी झाली होती आणि ती उत्तर अमेरिकेतील पहिली कायमस्वरूपी इंग्रजी वसाहत म्हणून ओळखली जाते.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT