वॉशिंग्टन : आपण शाळेपासून शिकलो आहोत की पाणी तीन अवस्थांमध्ये अस्तित्वात असते - बर्फ (ठोस), पाणी (तरल) आणि वाफ (वायू). मात्र, पृथ्वीच्या बाहेर पाण्याची आणखी एक अनोखी अवस्था असू शकते, असा शोध वैज्ञानिकांनी लावला आहे. शास्त्रज्ञांनी ‘प्लास्टिक आइस-7’ नावाच्या पाण्याच्या एका नवीन अवस्थेचा शोध लावला आहे, ज्याचा प्रथमच प्रत्यक्ष पुरावा मिळाला आहे. यापूर्वी वैज्ञानिकांनी अनेक सैद्धांतिक मॉडेल्समध्ये याची शक्यता वर्तवली होती, मात्र आता प्रत्यक्ष प्रयोगातून त्याचा शोध लागला आहे.
फ्रान्सच्या इन्स्टिट्यूट लॉ-लँगविन ( खङङ) मधील वैज्ञानिकांनी आंतरराष्ट्रीय संशोधन पथकासह 6 गीगापास्कल दाबाखाली पाण्यावर प्रयोग केला. अत्यंत उच्च दाबाखाली ते 327 0उ तापमानापर्यंत गरम करून ‘प्लास्टिक आइस-7’ तयार करण्यात आला. ‘नेचर’ या प्रतिष्ठित विज्ञान पत्रिकेत प्रकाशित अभ्यासानुसार, संशोधकांनी क्वासी-इलास्टिक न्यूट्रॉन स्कॅटरिंग तंत्राचा वापर करून हायड्रोजन अणूंच्या हालचाली ट्रॅक केल्या. यामुळे, 17 वर्षांपूर्वी वर्तवलेली शक्यता खरी ठरली, की अत्यंत उष्णता आणि दाबाखाली बर्फाच्या आतील हायड्रोजन अणू मायक्रोस्कोपिक स्तरावर सतत फिरत राहतात. ‘प्लास्टिक आइस-7’ मध्ये पाण्याच्या द्रव आणि घन या दोन्ही गुणधर्मांचे मिश्रण आहे, म्हणून याला ‘प्लास्टिक आइस’ असे नाव देण्यात आले. या अवस्थेत हायड्रोजन अणू अर्धवट विस्कळीत असतात, त्यामुळे त्याला एक अनोखी अंतर्गत संरचना प्राप्त होते. संशोधकांच्या मते, नेपच्यून, युरेनस आणि गुरुचा चंद्र युरोपा यांसारख्या बर्फाच्छादित ग्रहांवरही प्लास्टिक आइस-7 असू शकतो. हा शोध अंतराळातील ग्रह व चंद्रांच्या रचनेबाबत नवी माहिती देऊ शकतो आणि भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.