विश्वसंचार

पेरू देशात 800 वर्षांपूर्वीच्या ममीचा शोध

निलेश पोतदार

लिमा :

ममी म्हणजेच अनेक वर्षे विशिष्ट प्रक्रिया करून टिकवून ठेवलेला मृतदेह आणि इजिप्त यांचे एक वेगळेच समीकरण आहे. मात्र, केवळ इजिप्तमध्येच अशा ममी आहेत असे नाही. जगात अन्यत्रही नैसर्गिकरीत्या किंवा कृत्रिमरीत्या ममीकरण केलेल्या मृतदेहांचा शोध लागलेला आहे. आता पेरू देशात तब्बल 800 वर्षांपूर्वीची ममी सापडली आहे.

लिमा शहराच्या परिसरात ही ममी सापडली असून तिच्यासमवेत भाजीपाल्याचे अवशेष आणि हत्यारेही आढळली आहेत. पीटर वान डेलन लुना या पुरातत्त्व संशोधकांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की हा सांगाडा पुरुषाचा आहे की स्त्रीचा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या ममीच्या पूर्ण शरीराला दोरीने बांधण्यात आले आहे आणि चेहरा झाकण्यात आला आहे. ही त्या काळातील अंत्यसंस्काराची पद्धत असू शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. याठिकाणी मातीची काही भांडीही सापडली आहेत. पेरू देशातील इंका संस्कृतीच्या खुणा संशोधकांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यापूर्वीच्या व नंतरच्याही मानवी वसाहतींच्या अनेक खुणा संशोधकांना दिसून येत असतात.

SCROLL FOR NEXT