फ्लोरिडा : कीज, फ्लोरिडेच्या दक्षिणेकडे 100 मैल अंतरावर विस्तीर्ण पसरलेल्या उष्णकटिबंधीय बेटांची एक मालिकाच आढळून येते. हा सर्व भाग अतिशय अद्भुत मानला जातो. कारण, येथे असे अनेक जीव सापडतात, जे जगाच्या पाठीवर अन्यत्र कोठेच आढळून येत नाहीत. याच भागात आता पिवळ्या गोगलगायीची एक नवी प्रजाती शोधण्यात आली आहे.
संशोधकांनी शोधलेली चमकत्या पिवळ्या रंगाच्या या गोगलगायीला मार्गारिटा असे नाव दिले गेले आहे. गोगलगायीची ही प्रजाती कीजमध्ये आढळून आली, त्यावेळी अनेकांसाठी तो आश्चर्याचा धक्का होता. या गोगलगायीचा पिवळा रंग अनोखा आहेच, पण आश्चर्य म्हणजे या रंगाचाच ती शस्त्र म्हणून वापर करते. पीर जे जर्नलमध्ये या पिवळ्या गोगलगायीवरील संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.
अन्य गोगलगायींच्या तुलनेत ही प्रजाती अगदीच विभिन्न व वैशिष्ट्यपूर्ण आहे. अभ्यासकांचे असे मत आहे की, समुद्री गोगलगायी जमिनीवर राहणार्या गॅस्ट्रोपॉडपेक्षा खूपच वेगळे आहेत. ते अनेकदा बागेत आपल्या पाऊलखुणा ठेवून पुढे सरकल्याचेही आढळून येते. त्यांना कीडा गोगलगाय असेही म्हटले जाते.
मार्गारेट गोगलगायीवर संशोधन करणारे व जर्नलमधील लेखक रुडिगर बिलर म्हणतात, 'एरवी या गोगलगायी पाण्यात मुक्त विहार करत असतात. पण, एकदा मनासारखी जागा मिळाली की, ते तेथेच प्रदीर्घ काळ स्थिरावतात. या गोगलगायी रंगीबेरंगी असू शकतात. त्यामुळे, ते विशेषत: माशांनाही संभ्रमित करतात'.