विश्वसंचार

सागरी कोळ्याच्या नव्या प्रजातीचा शोध

Arun Patil

वॉशिंग्टन : संशोधकांनी अंटार्क्टिकाच्या रॉस समुद्रात पृष्ठभागापासून 1800 फूट खोलवर सागरी कोळ्यांच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. या कोळ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पंज्यांवर बॉक्सिंग ग्लोव्जसारखी रचना आहे. विचित्र आकाराचे, पिवळसर रंगाचे हे सागरी कोळी त्यांच्या चार डोळे आणि फुगीर पंज्यांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरतात.

हे 'सी स्पायडर' म्हणजे हॉर्सशू क्रॅब नावाचे खेकडे तसेच कोळी, विंचू यांचे दूरचे नातेवाईक आहेत. ते समुद्रतळाशी राहतात आणि तोंडाऐवजी स्ट्रॉसारख्या प्रोबोस्किसच्या सहाय्याने अन्न सेवन करतात. विशेष म्हणजे ते त्यांच्या पायांच्या सहाय्याने श्वास घेतात. जगभरात एक हजारपेक्षाही अधिक सागरी कोळ्यांच्या प्रजातींचा शोध घेण्यात आलेला आहे. नव्या प्रजातीला 'ऑस्ट्रोपॅलेनी हॅलानिची' असे नाव देण्यात आले आहे. या कोळ्यांचे पंजे फुगीर असून ते बॉक्सिंग ग्लोव्जसारखे दिसतात.

किड्यांना पकडण्यासाठी त्यांचा वापर केला जात असावा असे संशोधकांना वाटते. सेंट्रल मिशिगन युनिव्हर्सिटीतील बायोलॉजिस्ट अँड्रर्यू महोन यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. ही माहिती 'झूकीज' नावाच्या विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सागरी कोळ्यांचे धड एक सेंटीमीटर लांबीचे असून त्यांचे पाय लांबवले असता ते तीन सेंटीमीटर लांबीचे होतात.

SCROLL FOR NEXT