उदोन थानी : थायलंडमधील ‘इझान’ (ईशान्य) प्रदेशातील उदोन थानी प्रांताजवळ असलेले ‘नोंग हान कुमफावापी’ हे सरोवर लाखो कमळांमुळे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरते. स्थानिक भाषेत याला ‘ताले बुआ दाएंग’ म्हणजेच ‘लाल कमळांचा समुद्र’ म्हटले जाते. मात्र, यातील कमळे प्रत्यक्षात चमकदार गुलाबी रंगाची असल्यामुळे हे द़ृश्य एखाद्या जादुई गुलाबी समुद्रासारखे भासते. थाई भाषेत ‘बुआ दाएंग’ म्हणजे ‘लाल कमळ’ असले, तरी प्रत्यक्षात ही फुले गुलाबी रंगाची जलकुंभी (ट्रॉपिकल वॉटर लीली) आहेत.
हे सरोवर सुमारे 15,000 एकर (सुमारे 68 चौ. कि.मी.) पेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेले आहे. दरवर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या थंडीच्या महिन्यांमध्ये या सरोवरातील फुले पूर्णपणे बहरतात. जानेवारी महिन्यात हा बहर शिखरावर असतो. ही फुले फक्त सकाळच्या वेळी (सकाळी 6 ते 11) सूर्यप्रकाशामुळे उमलतात. त्यामुळे या द़ृश्याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक पहाटेच बोटीने सरोवरात प्रवेश करतात.
सूर्योदयाच्या वेळी गुलाबी फुलांवर पडणारी सोनेरी किरणे एक अविस्मरणीय अनुभव देतात. पर्यटक लहान पारंपरिक बोटी भाड्याने घेऊन या फुलांच्या ‘गुलाबी गालिच्यातून’ सफर करतात. एकेकाळी ‘अनसीन थायलंड’चा भाग असलेले हे सरोवर, आता ‘उदोन थानी’ प्रांतातील एक प्रमुख पर्यटनस्थळ बनले आहे. जगातील सर्वात विस्मयकारक सरोवरांपैकी एक म्हणून याची नोंद झाली असून, हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी स्वर्ग ठरले आहे.