14 देशांमधून जाणारा सरळसोट महामार्ग Pudhari File Photo
विश्वसंचार

14 देशांमधून जाणारा सरळसोट महामार्ग

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टनः या जगात अनेक रस्ते अनोखे आहेत आणि ते जगभरातील लोकांचे लक्षही वेधून घेतात. असाच एक रस्ता, खरे तर महामार्ग आहे, जो तब्बल चौदा देशांमधून जातो. विशेष म्हणजे या महामार्गाला कुठेही वळण नाही किंवा जोडरस्ता नाही. हा आहे जगातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग ‘पॅन अमेरिकन हायवे’. हा हायवे उत्तर अमेरिकेचे सर्वाधिक उत्तरेकडील टोक असलेल्या अलास्काच्या प्रुडो बे पासून दक्षिण अमेरिकेतील सर्वाधिक दक्षिणेस असलेल्या अर्जेंटिनाच्या उशैयापर्यंत जातो. या महामार्गाची एकूण लांबी 30 हजार किलोमीटर आहे.

‘पॅन अमेरिकन हायवे’ या रस्त्याची नोंद जगातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून करण्यात आली आहे. सर्वाधिक लांबीमुळं या रस्त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही करण्यात आली आहे. उत्तर अमेरिकेतून सुरू होणारा हा रस्ता तब्बल 14 देश ओलांडून दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनापर्यंत पोहोचतो. घनदाट वनक्षेत्र, वाळवंटीय प्रदेश, बर्फाळ प्रदेश तर कुठे पर्वतीय क्षेत्र ओलांडत हा रस्ता पुढे जातो. उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील राज्य जोडणं हा या महामार्गाच्या बांधणीमागील सर्वात मुख्य हेतू असून, तो 1923 मध्ये साध्य करण्यात आला. पॅन अमेरिकन हायवे मेक्सिको, ग्वाटेमाला, एल साल्वाडोर, होंडुरस, निकारागुआ, कोस्टा रिका, पनामा, कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, चिली वगैरे देशांतून अर्जेंटिनापर्यंत पोहोचतो. 30 हजार कि.मी. अंतराच्या या महामार्गावर वाहन चालवणं सोपी गोष्ट नाही. जाणून आश्चर्य वाटेल, पण 30,000 कि.मी.पर्यंत या रस्त्यावर कुठेच यू टर्न किंवा कोणताही जोडरस्ता नाही. थोडक्यात या महामार्गावर प्रवास सुरू केला, तर महिनोन्महिने इथूनच प्रवास करावा लागणार. हे अंतर ओलांडण्यासाठी जवळपास 60 दिवस अर्थात दोन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे मोठ्या रोडट्रीपवर निघणार्‍यांसाठी हा रस्ता एक उत्तम निवड ठरतो. फक्त विविध देशच नव्हे, तर या प्रवासादरम्यान विविध ॠतूही अनुभवता येतात. या रस्त्याने प्रवास करण्यासाठी वाहनचालकाचे वाहनावर सराईताप्रमाणे नियंत्रण असणे अपेक्षित आहे. कालोरस सांतामारिया नावाच्या एका व्यक्तीने या महामार्गावरील प्रवास 117 दिवसांमध्ये पूर्ण केला होता. रोड ट्रीप करण्यासाठी इच्छुकांनी या महामार्गावर प्रवासाला निघताना सोबत मॅकेनिकल सपोर्ट घेऊनच निघावा असा सल्ला दिला जातो. इतकंच नव्हे, तर खाण्यापिण्याच्या सोयीपासून अगदी काहीच पर्याय नाही मिळाले तर तंबूत राहण्याच्या सोयीपर्यंतची व्यवस्था करण्याचाही सल्ला इथे येणार्‍यांना दिला जातो. याच रस्त्यावर ‘डेरियन गॅप’ नावाचा एक धडकी भरवणारा टप्पाही येतो. ज्याप्रमाणे जगभरात या लांबलचक रस्त्याची चर्चा असते, त्याचप्रमाणं भारतातही असाच एक रस्ता/ महामार्ग आहे. देशातील सर्वात मोठा महामार्ग आहे एनएच 44. तब्बल 3745 कि.मी. अंतराच्या या महामार्गाने देशाची दोन टोके एकमेकांशी जोडली जातात, ती म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT