वॉशिंग्टन : 7 एप्रिल रोजी ‘कोलोसल बायोसायन्सेस’ या जैवतंत्रज्ञान कंपनीने जगाला धक्कादायक बातमी दिली. त्यांनी ‘कधीकाळी नष्ट झालेला डायर वुल्फ पुन्हा जिवंत केला आहे.’, असे जाहीर केले; मात्र आता त्यांच्या मुख्य वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे की, हे प्राणी खरे ‘डायर वुल्फ’ नसून केवळ जनुकीयद़ृष्ट्या बदललेले ‘ग्रे वुल्व्ज’ (Canis lupus) आहेत.
खालीसी, रोम्युलस आणि रेमस या तीन पांढर्या लांडग्यांनी जागतिक पातळीवर मथळे मिळवले, जेव्हा ‘कोलोसल’ ने त्यांना जगातील पहिले de- extincted dire wolves’ म्हणून घोषित केले. हे प्राणी 10,000 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या Aenocyon dirus जातीचे असल्याचा दावा करण्यात आला होता, पण अनेक वैज्ञानिकांनी लगेचच हा दावा भ—ामक असल्याचे सांगितले, हे लांडगे फक्त 20 जनुकांमध्ये बदल करून तयार केलेले ‘ग्रे वुल्फ’ आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. नवीन मुलाखतीत, ‘कोलोसल’च्या मुख्य वैज्ञानिक अधिकारी बेथ शापिरो यांनीही हे कबूल केले की हे लांडगे डायर वुल्फ नसून 20 जनुकीय संपादने असलेले क्लोन केलेले ग्रे वुल्फ आहेत; मात्र त्यांनी असा दावा केला की कंपनीने कधीच खरे डायर वुल्फ परत आणल्याचा चुकीचा दावा केला नव्हता.
‘पूर्वी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही प्रजातीला अगदी तशीच परत आणणे शक्य नाही’, शापिरो यांनी सांगितले. ‘आमचे प्राणी हे ग्रे वुल्फ आहेत, त्यात फक्त 20 जनुकांमध्ये बदल केला आहे. आम्ही हे सुरुवातीपासूनच स्पष्ट केले आहे, पण ‘डायर वुल्फ’ असा उल्लेख केल्याने लोक चिडतात.‘ शापिरो यांनी यापूर्वीही एका व्हिडीओमध्ये सांगितले होते की, ‘आम्ही त्यांना डायर वुल्फ म्हणतो कारण ते तसंच दिसतात आणि आम्ही त्यांच्या जुने डीएनए विश्लेषण करून ज्या प्रमुख गुणधर्म ओळखले ते यात आहेत.’ हा वाद काही अंशी प्रजातीच्या व्याख्यांमध्ये असलेल्या फरकामुळे निर्माण झाला आहे. शापिरो म्हणतात की ते ‘morphological species concept’ वापरत आहेत म्हणजेच एखाद्या प्राण्याची बाह्य रचना आणि दिसणे हे त्याच्या प्रजातीचे निर्देशक आहे, पण बहुतेक वैज्ञानिक biological species concept मानतात. डायर वुल्फ 10,000 वर्षांपूर्वी नष्ट झाला असल्याने आजच्या वैज्ञानिकांनी प्रत्यक्ष त्याला पाहिलेलं नाही आणि ‘कोलोसल’ ने आपल्या संप्रेषणात हे वैज्ञानिक बारकावे नेहमी स्पष्ट केलेले नसल्यामुळे जनमानसात गैरसमज पसरला.