वॉशिंग्टनः शास्त्रज्ञांनी अमेरिकेबाहेर पहिल्यांदाच ‘डिप्लोडोकस’ (थोडक्यात ‘डिप्पी’) या प्रसिद्ध अशा लांब मानेच्या डायनासोरच्या जीवाश्माची अधिकृत पुष्टी केली आहे. सुमारे १५ कोटी (१५० दशलक्ष) वर्षांपूर्वी हा अवाढव्य डायनासोर सध्याच्या स्पेन देशाच्या भागात पोहोचला होता, हे या शोधावरून स्पष्ट झाले आहे.
हा महाकाय शाकाहारी डायनासोर (Sauropod) केवळ उत्तर अमेरिकेतच राहत नव्हता, तर तो पँजिआ महाद्वीपाच्या विभाजनानंतर अस्तित्वात आलेल्या जमिनीच्या पुलाचा (Land bridge) वापर करून युरोपपर्यंत चालत गेला असावा, असे या नवीन अभ्यासातून समोर आले आहे. पूर्व स्पेनमधील एल कास्टेलर या लहान गावाजवळील ‘ला तेहेरिया’ या ठिकाणी हे अवशेष सापडले आहेत. उत्तर अटलांटिक महासागराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजेच ‘लेट जुरासिक’ युगात उत्तर अमेरिका आणि युरोपदरम्यान डायनासोरचे स्थलांतर होत होते, याचा हा एक सर्वात भक्कम पुरावा ठरला आहे. संशोधकांनी १५ सप्टेंबर रोजी ‘जर्नल ऑफ व्हर्टेब्रेट पॅलिओन्टॉलॉजी’ या मासिकात आपले संशोधन प्रकाशित केले आहे.
‘दिनोपोलिस फाऊंडेशन’चे संशोधक आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक सर्जिओ सांचेझ फेनोलोसा यांनी सांगितले, ‘अशा पुराजीवशास्त्रीय अभ्यासामुळे आपल्याला पृथ्वीवरील जीवनाचा इतिहास अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास, प्राचीन परिसंस्थेची पुनर्रचना करण्यास आणि काळाच्या ओघात त्यात कसे बदल झाले हे जाणून घेण्यास मदत होते.’ ‘डिप्पी’ हा जगातील सर्वात नामांकित आणि ओळखल्या जाणाऱ्या डायनासोरपैकी एक आहे. १९०० च्या दशकाच्या सुरुवातीला पिटस्बर्ग येथील कार्नेगी म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमध्ये याच्या सांगाड्याचे प्रदर्शन करण्यात आले होते. त्यानंतर इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, अर्जेंटिना आणि रशियासह जगभरात या शाकाहारी डायनासोरच्या पूर्ण आकाराच्या प्रतिकृती पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, आतापर्यंत डिप्लोडोकसचे मूळ अवशेष केवळ पश्चिम अमेरिकेतील ‘मॉरिसन फॉर्मेशन’पुरतेच मर्यादित मानले जात होते. स्पेनमध्ये सापडलेल्या या डिप्लोडोकसच्या अवशेषांमध्ये शेपटीचे १४ मणके आणि शेपटातील स्नायूंना व रक्तवाहिन्यांना आधार देणाऱ्या काही शेवरॉन हाडांचा समावेश आहे, जे अत्यंत उत्तम स्थितीत आढळून आले आहेत.