Digital library | पारंपरिक वैद्यकीय उपचार पद्धतींची ‘डिजिटल लायब्ररी’ Pudhari File Photo
विश्वसंचार

Digital library | पारंपरिक वैद्यकीय उपचार पद्धतींची ‘डिजिटल लायब्ररी’

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताने आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक कामगिरी करत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आयुर्वेद, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा आणि होमिओपॅथी यांसारख्या पारंपरिक उपचार पद्धतींना औपचारिकपणे डिजिटल स्वरूप देणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. या कामगिरीमुळे भारताने केवळ आपला हजारो वर्षांचा वारसा जपला नाही, तर त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन भविष्यासाठी सुरक्षितही केले आहे. हे प्राचीन वैद्यकीय ज्ञान आता केवळ जुन्या ग्रंथांपुरते किंवा हस्तलिखितांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते एका अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित प्लॅटफॉर्मवर संग्रहित करण्यात आले आहे. ‘ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी’ (TKDL) असे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नाव आहे.

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारताच्या पारंपरिक ज्ञानाचे संरक्षण करणे, ते जागतिक आरोग्यासाठी उपलब्ध करून देणे आणि ‘बायोपायरसी’ म्हणजेच ज्ञानाच्या चोरीपासून त्याचे रक्षण करणे हा आहे. भारताच्या या दूरद़ृष्टीच्या कामाचे जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) कौतुक केले आहे. TKDL ही एक साधीसुधी डिजिटल लायब्ररी नसून, ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंगने सुसज्ज असलेली एक स्मार्ट प्रणाली आहे. संस्कृत, तमिळ, पर्शियन आणि अरबी यांसारख्या अनेक प्राचीन भाषांमधील लाखो पानांची माहिती या प्रणालीद्वारे डिजिटल, बहुभाषिक आणि सहज शोधण्यायोग्य बनवली जात आहे.

यामध्ये विविध औषधी वनस्पती, औषधांचे फॉर्म्युले, रोग बरे करण्याच्या पद्धती आणि त्यांच्या मात्रा यांची अत्यंत पद्धतशीरपणे नोंद केली आहे. हजारो वर्षांपूर्वी सांगितलेले एखादे औषध आजच्या कोणत्या आजारावर उपयुक्त ठरू शकते, हे शास्त्रज्ञ आता काही सेकंदात शोधू शकतात. जे काम पूर्वी अशक्य वाटत होते, ते आता ‘एआय’ मुळे शक्य झाले आहे. TKDL प्रकल्पाचा एक अत्यंत महत्त्वाचा उद्देश म्हणजे भारताच्या पारंपरिक ज्ञानाला चोरीपासून वाचवणे. एकेकाळी हळद, कडुलिंब आणि बासमती तांदूळ यांसारख्या भारतीय गोष्टींवर परदेशी कंपन्यांनी पेटंट मिळवण्याचा प्रयत्न केला होता.

आता TKDL च्या माध्यमातून भारताने हजारो औषधी फॉर्म्युले डिजिटल स्वरूपात सार्वजनिक केल्यामुळे या धोक्यापासून मुक्तता मिळाली आहे. पारंपरिक औषध पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांना जोडणारा हा एक जागतिक स्तरावर स्वीकारण्यायोग्य आदर्श मॉडेल असल्याचे थकज ने म्हटले आहे. SAHI, NAMASTE आणि आयुष रिसर्च पोर्टल यांसारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारताने टेलि-मेडिसिन, डिजिटल रेकॉर्डस् आणि हर्बल डेटा स्टोरेज यांसारख्या सुविधाही सुलभ केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT