शिकागो : आपल्या कुटुंबातील पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या इलेक्ट्रिशियन आणि प्लंबरच्या व्यवसायाचा वारसा मी एका वेगळ्या रूपात पुढे चालवत आहे, असे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. जॉन पांडोल्फिनो गमतीने म्हणतात. त्यांच्या मते, मानवी अन्ननलिका ही मुळात एक ‘पाईप’ आहे, ज्यात काही ‘इलेक्ट्रिकल वायरिंग’ बसवलेले असते. डॉ. पांडोल्फिनो हे ‘नॉर्थवेस्टर्न मेडिसिन डायजेस्टिव्ह हेल्थ इन्स्टिट्यूट’चे संचालक आहेत. त्यांनी अन्ननलिकेच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ‘डिजिटल ट्विन्स’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.
डिजिटल ट्विन म्हणजे एखाद्या रुग्णाच्या शरीराचा किंवा अवयवाचा हुबेहूब आभासी नमुना. डॉ. पांडोल्फिनो यांची टीम रुग्णाच्या अन्ननलिकेची अचूक परिमाणे असलेला एक डिजिटल क्लोन तयार करते. हा मॉडेल अन्ननलिकेतील दाब आणि हालचालींची तंतोतंत पुनर्रचना करतो. या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश ‘मायोटॉमी’ सारख्या शस्त्रक्रियांची अचूकता वाढवणे हा आहे. या शस्त्रक्रियेमध्ये अन्ननलिकेचे स्नायू कापले जातात. शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच, तो विशिष्ट रुग्ण या प्रक्रियेला कसा प्रतिसाद देईल, हे या डिजिटल मॉडेलद्वारे तपासले जाते.
डॉ. पांडोल्फिनो आणि त्यांच्या सहकार्यांनी नुकतीच 400 व्यक्तींवर एक क्लिनिकल ट्रायल सुरू केली आहे. या आभासी क्लोनच्या मदतीने केलेली शस्त्रक्रिया रुग्णांसाठी अधिक फायदेशीर ठरते का, याचा शोध याद्वारे घेतला जाणार आहे. ‘आम्ही पाहिले की काही रुग्णांमध्ये उपचारानंतर अन्ननलिकेची भिंत कमकुवत होऊन फुगल्यासारखी होत होती. हे का घडते, हे समजण्यासाठी आम्ही ‘व्हर्च्युअल इसोफॅगस’ला (आभासी अन्ननलिका) विविध पर्याय दिले.
शस्त्रक्रियेचा प्रकार, स्नायू किती खोलवर कापायचे, यासारख्या अनेक व्हेरिएबल्सचे सिम्युलेशन आम्ही करून पाहिले,’ असे डॉ. पांडोल्फिनो यांनी सांगितले. हे तंत्रज्ञान केवळ अन्ननलिकेपुरते मर्यादित नाही. भविष्यात हृदय, मूत्राशय यांसारख्या इतर अवयवांसाठीही डिजिटल ट्विन्सचा वापर होऊ शकतो. यामुळे प्राण्यांवरील चाचण्यांचे प्रमाण कमी होऊ शकते आणि प्रत्येक रुग्णाला त्याच्या शरीररचनेनुसार ‘पर्सनलाईज्ड मेडिसिन’ (वैयक्तिक उपचार) मिळणे शक्य होईल.