वॉशिंग्टन : मंगळ ग्रहावर अनेक देशांच्या अंतराळ संशोधन संस्था अनेक वर्षांपासून संशोधन करीत आहेत. 'नासा'ने तर मंगळावर अनेक रोव्हर पाठवलेली आहेत. त्यापैकी पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळभूमीवर गोळा केलेले खडक-मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात आता अडचण निर्माण झाली आहे. 'नासा'चे 'सँपल रिटर्न मिशन' ही अशी पहिली मोहीम असेल ज्यामध्ये अन्य ग्रहावरून रॉकेट पृथ्वीकडे झेप घेईल. मात्र, या मोठ्या मोहिमेवर संकटाचे ढग गोळा झाले आहेत.
या मोहिमेचा खर्च अव्वाच्या सव्वा वाढला असल्याने ही मोहीम संकटात सापडली आहे. 'नासा'ने बनवलेल्या एका रिव्ह्यू पॅनेलने इशारा दिला आहे की, या मोहिमेचा खर्च 4.4 अब्ज डॉलर्स मानला जात होता, पण आता तो वाढून 8 ते 11 अब्ज डॉलर्सवर गेला आहे. या मोहिमेमुळे 'नासा'च्या अन्य अनेक मोहिमा बंद पडण्याचा धोका आहे. पॅनेलच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मंगळावरून सँपल आणण्याचे मूळ बजेट अवास्तविक असून तितक्या खर्चात ही मोहीम घडू शकत नाही.
सध्याच्या काळात अशी कोणतीही विश्वसनीय, सुसंगत टेक्नॉलॉजी नाही जिच्या सहाय्याने 4 अब्ज डॉलर्समध्ये ही मोहीम पूर्ण होईल. ही मोहीम इतकी खर्चिक बनू शकते की त्यामुळे शुक्राच्या अध्ययनासाठीच्या अन्य योजना रद्द कराव्या लागू शकतात. पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळावरील खडक, मातीचे नमुने टायटॅनियम ट्यूबमध्ये भरले आहेत. मंगळावर एक लँडर पाठवले जाणार असून, ते लॉकहिड मार्टिनकडून बनवले जात आहे. पर्सिव्हरन्स रोव्हर या नमुन्यांच्या ट्यूब्स लँडरमध्ये ठेवेल व तेथून ते पृथ्वीच्या दिशेने उड्डाण करील. मात्र, आता ही मोहीम संकटात सापडली आहे.