वेगवेगळी जीवनसत्त्वे आणि त्यांचा उपयोग Pudhari File Photo
विश्वसंचार

वेगवेगळी जीवनसत्त्वे आणि त्यांचा उपयोग

पुढारी वृत्तसेवा

जीवनसत्त्वे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. सप्लिमेंटस्वर किंवा पूरक आहारावर अवलंबून राहण्याऐवजी आरोग्य तज्ज्ञ अनेकदा आहारातून ‘हे’ महत्त्वाचे पोषक घटक मिळवण्याची शिफारस करतात. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. जीवनसत्त्वे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ती शरीराच्या प्रत्येक कार्याला चालना देतात. प्रत्येक जीवनसत्त्वाचे कार्य वेगवेगळे असते. जर तुमच्या शरीरात एखाद्या जीवनसत्त्वाचा अभाव असेल, तर तुम्हाला त्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे निर्माण होणार्‍या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊ, कोणती जीवनसत्त्वे शरीरात काय काम करतात?

व्हिटॅमिन ए : रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी, द़ृष्टिदोष दूर होण्यासाठी, तसेच त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन ‘ए’ची आवश्यकता असते. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन ‘ए’ची कमतरता असेल, तर तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ शकते. तसेच डोळ्यांशी संबंधित विविध समस्याही निर्माण होऊ शकतात. व्हिटॅमिन ‘ए’चीच्या स्रोतांमध्ये अंडी, गाजर, कोथिंबीर व पालक यांचा समावेश होतो.

व्हिटॅमिन बी 1 (थायमिन) : मज्जातंतू वहन आणि ऊर्जा उत्पादनासाठी व्हिटॅमिन ‘बी’ची 1 गरजेचे आहे. व्हिटॅमिन ‘बी’ 1 च्या कमतरतेमुळे मानसिक उदासीनता, गोंधळ व स्नायूंची ताकद कमी होऊ शकते. व्हिटॅमिन ‘बी’ 1 च्या स्रोतांमध्ये मांस, सगळी धान्ये व शेंगा यांचा समावेश होतो.

व्हिटॅमिन बी 2 (रिबोफ्लेविन) : व्हिटॅमिन ‘बी’ 2 हे तुमच्या मज्जासंस्थेसाठी अत्यंत गरजेचे असते. दही, दूध, केळी व मशरूम यांच्या सेवनातून तुम्हाला व्हिटॅमिन ‘बी’ मिळू शकते. व्हिटॅमिन ‘बी’ 2 च्या कमतरतेमुळे तोंडावर फोड येणे, त्वचेवर जखम होणे आणि स्नायूंचा प्रतिसाद कमी होऊ शकतो.

व्हिटॅमिन बी 3 (नियासिन) : व्हिटॅमिन बी 3 जे अतिसार, त्वचारोग आणि स्मृतिभ्रंश दूर करते. शेंगदाणे आणि मांस हे समृद्ध स्रोत आहेत.

व्हिटॅमिन बी 5 (पॅथोजेनिक अ‍ॅसिड) : व्हिटॅमिन बी5, ज्याला पँटोथेनिक अ‍ॅसिड असेही म्हणतात, हे शरीरातील विविध कार्यांसाठी महत्त्वाचे आहे. हे आपल्या शरीराच्या ऊर्जा निर्माण प्रक्रियेत मदत करते आणि फॅट्स, प्रोटीन्स, आणि कार्बोहायड्रेटस्चे विभाजन करून ऊर्जा निर्माण करते. यामुळे आपल्या मज्जासंस्थेची कार्यक्षमता वाढते, त्वचा आणि केसांचे आरोग्य टिकवून ठेवते, आणि शरीरातील स्टेरॉईडस् आणि न्यूरोट्रान्समीटरची निर्मितीही यावर अवलंबून असते.

व्हिटॅमिन बी 6 : व्हिटॅमिन बी 6 लाल रक्तपेशींचे उत्पादन सक्षम करते. त्याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, झोपेचा त्रास आणि चिडचिड होऊ शकते. व्हिटॅमिन बी 6 च्या स्रोतांमध्ये मांस, मासे यांचा समावेश होतो.

व्हिटॅमिन बी 7 (बायोटिन) : बायोटिन हे जीवनसत्त्व निरोगी त्वचा, केस आणि नखांसाठी अत्यंत गरजेचे असते. त्याची कमतरता असल्याने जाणवणार्‍या लक्षणांमध्ये नैराश्य, भ्रम व स्नायू दुखणे या त्रासांचा समावेश होतो. अंड्यातील पिवळा बलक आणि सोयाबीन हे याचे सर्वोत्तम स्रोत आहेत.

व्हिटॅमिन बी 9 (फोलेट) : फॉलिक अ‍ॅसिड डीएनए संश्लेषणासाठी महत्त्वपूर्ण आहे. विशेषतः गर्भधारणेदरम्यान कारण- ते विकसनशील बाळामध्ये न्यूरल ट्यूब दोष टाळण्यास मदत करते. व्हिटॅमिन बी 9 च्या कमतरतेमुळे वजन कमी होणे, अशक्तपणा होऊ शकतो. कडधान्ये, अंडी आणि पालेभाज्यांमध्ये फोलेट भरपूर प्रमाणात असते.

व्हिटॅमिन बी 12 : लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी बी 12 महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन ‘बी’ 12 च्या कमतरतेमुळे रक्तपेशी अपरिपक्व होऊ शकतात. आंबलेले पदार्थ आणि भरपूर पाणी हे याचे सर्वोत्तम स्रोत आहेत.

व्हिटॅमिन सी : व्हिटॅमिन सी अँटिऑक्सिडंटस् म्हणून कार्य करते. त्यामुळे लोह शोषण्यास आणि मोतीबिंदू टाळण्यास मदत होते. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्तस्राव होऊ शकतो, हाडे ठिसूळ होऊ शकतात आणि जखमा भरण्यास उशीर लागू शकतो. आवळा हे व्हिटॅमिन सीच्या सर्वांत श्रीमंत स्रोतांपैकी एक आहे.

व्हिटॅमिन डी : व्हिटॅमिन डी हाडांची निर्मिती आणि देखभाल यांसाठी आवश्यक आहे. सागरी मासे, लोणी आणि अंड्यातील पिवळा बलक हे या जीवनसत्त्वाचे समृद्ध स्रोत आहेत.

व्हिटॅमिन ई : व्हिटॅमिन ई एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येऊ शकतो. त्याच्या सर्वोत्तम स्रोतांमध्ये वनस्पती तेल, काजू, बदाम आणि कडधान्ये यांचा समावेश होतो.

व्हिटॅमिन के : व्हिटॅमिन के रक्त गोठण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे रक्तस्राव होण्याचा धोका वाढू शकतो. हिरव्या पालेभाज्या आणि स्प्राउटस् हे व्हिटॅमिन केचे उत्कृष्ट स्रोत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT