नवी दिल्ली ः आपण बाजारात गेल्यावर तिथे आपल्याला लाल आणि केशरी अशा दोन्ही रंगांची गाजरे पाहायला मिळतात. ही दोन्ही गाजरे दिसायला सारखीच असली, तरी त्यांच्या चवीमध्ये, पौष्टिकतेमध्ये आणि वापरामध्ये मोठा फरक असतो.
लाल गाजरामध्ये ‘लायकोपिन’ नावाचे अँटी-ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. हेच घटक टोमॅटोमध्येही आढळते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. केशरी रंगाच्या गाजरात ‘बीटा-कॅरोटीन’ चे प्रमाण सर्वाधिक असते. आपले शरीर या घटकाचे रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये करते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. लाल गाजरे चवीला अधिक गोड आणि रसाळ असतात. त्यांचा पोत थोडा मऊ असतो. त्यामुळेच भारतात हिवाळ्यात लाल गाजराचा हलवा बनवण्यासाठी यालाच पसंती दिली जाते. केशरी गाजर हे लाल गाजराच्या तुलनेत कमी गोड असतात. ती जास्त कुरकुरीत असतात, त्यामुळे सॅलडमध्ये किंवा कच्ची खाण्यासाठी ही जास्त वापरली जातात.
लाल गाजर हे प्रामुख्याने हिवाळ्याच्या हंगामात नोव्हेंबर ते फेब—ुवारी उपलब्ध असते. हे प्रामुख्याने आशियाई देशांमध्ये, विशेषतः भारत आणि पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर पिकवले जाते. केशरी गाजर हे वर्षभर उपलब्ध असते. पाश्चात्य देशांमध्ये हे जास्त लोकप्रिय आहे. हायबि—ड प्रजातीमुळे आता भारतातही ते बाराही महिने मिळते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि सॅलडसाठी केशरी गाजर उत्तम आहे, तर हृदयाचे आरोग्य आणि चविष्ट हलव्यासाठी लाल गाजर खाणे फायदेशीर ठरते.