सध्या जवळपास प्रत्येक दुसर्या व्यक्तीस यकृताशी (लिव्हर) संबंधित समस्या जाणवू लागली आहे. धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपण संतुलित आहाराच्या सवयींकडे सर्वात जास्त दुर्लक्ष करतो. वेळ वाचवण्यासाठी बाजारातील तयार अन्न किंवा पुन्हा पुन्हा गरम केलेले अन्न खाल्ले जाते. अशा चुकीच्या सवयी आपल्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम करतात आणि हळूहळू संपूर्ण पचनसंस्था बिघडते. आजच्या काळात पचनसंस्था बिघडण्यासाठी दारू पिण्याची गरज नाही, आपल्या चुकीच्या खाण्याच्या सवयीच हे काम करत आहेत! आपण दररोज आपल्या आहारात अशा अनेक गोष्टी घेत आहोत ज्या यकृतासाठी ‘स्लो पॉईझन’ ठरत आहेत. अशाच काही गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत, ज्या रोजच्या जेवणात असतात, पण आपल्या पोटासाठी, विशेषतः यकृतासाठी अत्यंत घातक ठरतात.
बर्गर, फ्रेंच फ्राईज, समोसे, पकोडे यांसारखे फास्ट फूड चवदार असले, सहज बाजारात मिळत असले तरी आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक ठरू शकतात. यामुळे पोटात जडपणा, अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते. यात असणारे ट्रान्स फॅटस् आणि भरपूर तेल यकृताच्या पेशींना नुकसान पोहोचवतात. हे फॅटस् यकृतात साचून ‘फॅटी लिव्हर’सारखी स्थिती निर्माण करतात. दीर्घकाळ हे अन्न खाल्ल्यास यकृतशोथ, सिरोसिस किंवा यकृत निकामी होण्याचा धोका वाढतो.
जास्त साखर खाणे हे दारूपेक्षा कमी घातक नाही. केक, कुकीज, मिठाई, साखर यांसारख्या गोड पदार्थांचे अधिक सेवन केल्यास नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) होऊ शकते. ही समस्या त्यांना होते जे दारू पित नाहीत, पण गोड आणि प्रोसेस्ड फूड जास्त खातात.
पॅकेज्ड स्नॅक्स, इंस्टंट नूडल्स, प्रोसेस्ड मांस, रेडी-टू-ईट फूड यामध्ये प्रिझर्वेटिव्हज, कृत्रिम रंग व फ्लेवर असतात. हे सर्व घटक यकृतासाठी विषासारखे असतात. अशा अन्नामुळे अॅसिडिटी, गॅस, वायू यांसारख्या पचनाच्या समस्या सुरू होतात.
साखरेप्रमाणे मिठाचाही अतिरेक हानिकारक आहे. मिठात असलेला सोडियम शरीरात पाणी धरून ठेवतो, ज्यामुळे सूज येते आणि उच्च रक्तदाबाची समस्या होते. जास्त मीठ खाल्ल्यास यकृत पेशींना नुकसान होऊन फायब्रोसिस वाढू शकते आणि शेवटी यकृत सिरोसिसचा धोका उद्भवतो.
सोडा आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफीन, साखर आणि कार्बोनेट भरपूर प्रमाणात असते. हे सर्व घटक पोटातील अॅसिड वाढवतात, ज्यामुळे अॅसिड रिफ्लक्स आणि गॅसचे त्रास होतात. त्यामुळे अशा पेयांपासून दूर राहणेच योग्य ठरेल.