लॉस एंजेलिस : हॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री मॅरिलिन मन्रो हिच्या गूढ मृत्यूबाबत 64 वर्षांनंतर एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. मॅरिलिनच्या वैयक्तिक डॉक्टरांनी तिच्या मृत्यूमध्ये स्वतःची भूमिका लपवण्यासाठी खोटे बोलल्याचा दावा एका नव्या चरित्रामध्ये करण्यात आला आहे. तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या औषधांपैकी एक औषध आपण लिहून दिलेच नव्हते, असा दावा या डॉक्टरांनी आयुष्यभर केला होता; मात्र आता त्यांनी स्वाक्षरी केलेली औषधांची मूळ चिठ्ठी (प्रिस्किप्शन) समोर आल्याने त्यांच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे.
मॅरिलिन मन्रोचा 5 ऑगस्ट 1962 रोजी वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी तिच्या लॉस एंजेलिसमधील राहत्या घरी अमली पदार्थांच्या अतिसेवनाने मृत्यू झाला होता. त्यावेळी प्रशासनाने ती संभाव्य आत्महत्या असल्याचे घोषित केले होते. तिच्या शरीरात नेम्बुटल आणि क्लोरॉल हायड्रेट या दोन औषधांचे प्राणघातक मिश्रण आढळले होते. हॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक अँड्र्यू विल्सन यांनी त्यांच्या ‘आय वॅना बी लव्हड बाय यू: मेरीलिन मन्रो, अ लाईफ इन 100 टेक्स ’ या नव्या पुस्तकात हा खळबळजनक दावा केला आहे. मॅरिलिनचे वैयक्तिक डॉक्टर हायमन एंजेलबर्ग यांनी 2005 मधील त्यांच्या मृत्यूपूर्वी, तसेच 1982 मधील पोलिस चौकशीत सांगितले होते की, त्यांनी मॅरिलिनला फक्त नेम्बुटल लिहून दिले होते आणि क्लोरॉल हायड्रेट या औषधाशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. वास्तविक पाहता, ही दोन्ही औषधे एकत्र घेणे अत्यंत धोकादायक असते.
लेखक विल्सन यांना संशोधनादरम्यान 1962 मधील एक मूळ प्रिस्क्रिप्शन सापडले, ज्यावर डॉक्टर एंजेलबर्ग यांची स्पष्ट स्वाक्षरी आहे आणि त्यांनीच मॅरिलिनला क्लोरॉल हायड्रेट लिहून दिल्याचे सिद्ध होते. 2011 मध्ये एका लिलावात हे प्रिस्क्रिप्शन विकले गेले होते. लेखकाच्या मते, मॅरिलिनच्या मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या दोन महिन्यांत तिला तब्बल 830 युनिटस् औषधे लिहून देण्यात आली होती. हे प्रमाण कोणत्याही सामान्य व्यक्तीला अनेकदा मारण्यासाठी पुरेसे होते.
मॅरिलिन मन्रोच्या मृत्यूभोवती अनेक दशकांपासून कम्युनिस्ट कटकारस्थान आणि केनेडी कुटुंबाशी असलेल्या संबंधांच्या वेगवेगळ्या थिअरीज फिरत आहेत. मात्र, विल्सन यांच्या मते हा कोणताही राजकीय कट नसून सरळ सरळ वैद्यकीय निष्काळजीपणा आणि सदोष मनुष्यवधाचा प्रकार आहे. घटनेच्या रात्री मॅरिलिनचा मृतदेह सापडल्यानंतर डॉक्टर एंजेलबर्ग यांनी पोलिसांना फोन करण्यासाठी एक तास उशीर केला होता आणि थेट ती आत्महत्या असल्याचे पोलिसांना सांगितले होते. विल्सन यांच्या मते, जर ही घटना आजच्या काळात घडली असती, तर मन्रोच्या डॉक्टरांवर थेट कायदेशीर गुन्हा दाखल होऊन त्यांना तुरुंगवास झाला असता. या नव्या पुराव्यामुळे मॅरिलिन मन्रोच्या मृत्यूच्या गुन्ह्याला आता एक वेगळेच वळण मिळाले आहे.