साओ पाऊलो : मानवी उत्क्रांतीच्या प्रवासाबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दातांच्या जीवाश्मांवर केलेल्या एका नवीन अभ्यासानुसार, मानवाचे आदिम पूर्वज आपण मानतो त्यापेक्षा कितीतरी आधी आफ्रिका खंडातून बाहेर पडून इतरत्र स्थायिक झाले असावेत, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.
आधुनिक मानव म्हणजेच ‘होमो सॅपिअन्स’ हे मानवी वंशावळीतील एकमेव जिवंत सदस्य आहेत. मानवी वंशाचा उगम साधारण 20 ते 30 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत झाला आणि काही लाख वर्षांपूर्वी मानवाने आफ्रिका सोडली, असे आतापर्यंत मानले जात होते. मात्र, जॉर्जिया प्रजासत्ताकातील ‘दमानिसी’ या मध्ययुगीन डोंगराळ शहरात मिळालेल्या अवशेषांनी या सिद्धांताला नवे वळण दिले आहे. सुमारे 35 वर्षांपूर्वी दमानिसी येथे झालेल्या उत्खननात 18 लाख वर्षांपूर्वीच्या पाच मानवी कवटीचे अवशेष सापडले होते.
आफ्रिकेबाहेर सापडलेल्या प्राचीन मानवी प्रजातींच्या सर्वात जुन्या स्थळांपैकी हे एक आहे. या जीवाश्मांमध्ये दिसणाऱ्या प्रचंड शारीरिक भिन्नतेमुळे संशोधकांमध्ये मोठा वाद आहे. एक मत : काही संशोधकांच्या मते, हे सर्व अवशेष ‘होमो इरेक्टस’ या एकाच प्रजातीचे आहेत आणि त्यातील फरक हा स्त्री-पुरुष किंवा नैसर्गिक भिन्नतेमुळे आहे. दुसरे मत : काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येथे दोन वेगवेगळ्या मानवी प्रजाती होत्या. एक म्हणजे ‘होमो जॉर्जिकास’ आणि दुसरी ‘होमो कौकेसी’. बाझीलमधील साओ पाऊलो विद्यापीठातील पुरातत्त्व शास्त्रज्ञ व्हिक्टर नेरी यांच्या मते, या वादाचा निकाल लागल्यास हे स्पष्ट होईल की, आफ्रिका सोडणारी पहिली प्रजाती ‘होमो इरेक्टस’ होती की त्यांच्या आधीही इतर कोणी बाहेर पडले होते.
आतापर्यंतचे बहुतांश संशोधन हे सापडलेल्या कवट्यांवर आधारित होते. मात्र 3 डिसेंबर रोजी ‘झङजड जपश’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या नवीन अभ्यासात संशोधकांनी दातांच्या रचनेतील साम्य आणि फरकांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. दातांचा अभ्यास हा उत्क्रांतीचा इतिहास समजून घेण्यासाठी अधिक अचूक मानला जातो.