Train Disappeared in Tunnel | एका बोगद्यानं गिळली होती १०४ प्रवाशांसह अख्खी ट्रेन? 
विश्वसंचार

Train Disappeared in Tunnel | एका बोगद्यानं गिळली होती १०४ प्रवाशांसह अख्खी ट्रेन?

पुढारी वृत्तसेवा

रोम : जगभरात अनेक काल्पनिक कथा पिकवण्यात आलेल्या आहेत आणि त्या अजूनही लोकांना खऱ्या वाटतात. अशीच एक कथा इटलीमधील रेल्वेची आहे जी एका बोगद्यात तब्बल १०४ प्रवाशांसह गायब झाल्याचे म्हटले जाते. ही रहस्यमय घटना १९११ मध्ये इटलीत घडली होती, असे सांगितले जाते; मात्र ही सर्व काल्पनिकच कथा आहे.

या कथेनुसार ‘झानेट्टी’ या नामांकित इटालियन रेल्वे उत्पादक कंपनीने एका अत्याधुनिक आणि प्रीमियम रेल्वेची निर्मिती केली होती. या नवीन रेल्वेच्या पहिल्या वहिल्या प्रवासासाठी कंपनीने वर्तमानपत्रात जाहिराती देऊन लोकांना मोफत प्रवासाचे आमंत्रण दिले होते. या ऐतिहासिक प्रवासाचा भाग होण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांसह एकूण १०४ प्रवासी अत्यंत उत्साहाने रेल्वेत चढले. रेल्वेने वेग पकडला आणि सर्व काही सुरळीत सुरू होते; पण कोणालाच कल्पना नव्हती की, हा प्रवास एका न सुटणाऱ्या चक्रव्यूहात बदलणार आहे. प्रवासादरम्यान ही रेल्वे एका डोंगराच्या बोगद्यातून जाणार होती. रेल्वे अत्यंत वेगाने त्या बोगद्याच्या अंधारात शिरली. पुढच्या स्टेशनवर रेल्वेचे स्वागत करण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती, पण तास सरले तरी रेल्वे बाहेर आलीच नाही. रेल्वे बोगद्यातच थांबली असावी या शंकेने रेल्वेचे अधिकारी आणि पोलिसांनी बोगद्यात शोधमोहीम सुरू केली; मात्र बोगद्याच्या आत जे दिसले त्याने सर्वांचेच धाबे दणाणले. बोगद्यात रेल्वेचा किंवा कोणत्याही प्रवाशाचा साधा नामोनिशाणही नव्हता.

संपूर्ण रेल्वे जणू हवेत विरघळली होती. या संपूर्ण घटनेत केवळ दोन प्रवासी वाचले, ज्यांनी बोगद्यात शिरण्यापूर्वी चालत्या ट्रेनमधून उडी मारली होती. मानसिक धक्क्यात असलेल्या एका प्रवाशाने सांगितले की, जशी ट्रेन बोगद्याच्या तोंडापाशी आली, तसा अचानक एक दाट पांढरा धूर पसरला आणि संपूर्ण वातावरणात एक गूढ शांतता पसरली. प्रचंड भीती वाटल्याने त्यांनी चालत्या ट्रेनमधून बाहेर उडी ठोकली. त्यांच्या डोळ्यादेखत ती अख्खी रेल्वे त्या रहस्यमय धुरात गायब झाली. ही रेल्वे ‘टाईम ट्रॅव्हल’ करून मेक्सिको किंवा रशियात पोहोचल्याच्या कथाही नंतर जोडल्या गेल्या.

वास्तवात इटलीच्या रेल्वे विभागाकडे किंवा कोणत्याही इटालियन वृत्तपत्राकडे १९११ मधील अशा कोणत्याही अपघाताची किंवा ट्रेन गायब झाल्याची नोंद नाही. कथेत उल्लेख असलेला ‘झानेट्टी बोगदा’ इटलीच्या नकाशावर किंवा इतिहासात कुठेही अस्तित्वात नव्हता. हे काल्पनिक कथानक रशियन लेखक निकोलाय चेर्काशिन यांनी १९८० च्या दशकात लिहिलेल्या एका गूढ कल्पित कथेवर आधारित आहे. १९९० च्या दशकात इंटरनेटचा प्रसार झाल्यानंतर ही कथा रशियन भाषेतून इंग्रजीत आणि नंतर जगभरात ‘खरी घटना’ म्हणून पसरवण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT