वॉशिंग्टन : अंतराळ संशोधनात नेहमीच नवनवीन शोध लागत असतात. मात्र, अलीकडेच जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने एका अशा ग्रहाचा शोध लावला आहे, ज्याने जगभरातील शास्त्रज्ञांना बुचकळ्यात टाकले आहे. या ग्रहाचे वातावरण आपल्या सूर्यमालेतील कोणत्याही ग्रहासारखे नसून, तिथे चक्क ‘काजळीचे’ ढग असून, खोलवर हिऱ्यांचा पाऊस पडत असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गुरू ग्रहाच्या आकाराचा हा ग्रह आपल्यापासून 750 प्रकाशवर्षे दूर आहे. आपल्या सूर्यमालेतील ग्रहांच्या वातावरणात प्रामुख्याने हायड्रोजन आणि हेलियमचे मिश्रण असते. तसेच पाणी, मिथेन किंवा कार्बन डायऑक्साईड यांसारखे रेणू आढळतात. मात्र, झडठ ग2322-2650 ल नावाच्या या ग्रहावर यापैकी काहीही आढळलेले नाही. या ग्रहाच्या वातावरणाच्या वरच्या थरात काजळीचे (Soot)) दाट ढग आहेत, जे वातावरणात खोलवर गेल्यावर प्रचंड दाबामुळे हिऱ्यांमध्ये रूपांतरित होतात. हेलियम आणि कार्बनने बनलेले असे वातावरण यापूर्वी कधीही कोणत्याही ग्रहावर दिसलेले नाही. या शोधाचे सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे हा ग्रह ज्या ताऱ्याभोवती फिरतो, तो एखादा सामान्य तारा नसून एक ‘पल्सर’ आहे.
पल्सर म्हणजे अशा ताऱ्याचा केंद्रभाग जो महाविस्फोटानंतर अत्यंत घन बनला आहे आणि तो वेगाने फिरत असताना किरणोत्सर्गी लहरी बाहेर सोडत असतो. कार्नेगी अर्थ अँड प्लॅनेटस् लॅबोरेटरीचे शास्त्रज्ञ पीटर गाओ म्हणतात, ‘हा शोध पूर्णपणे अनपेक्षित होता. डेटा पाहिल्यावर आमची पहिली प्रतिक्रिया ‘हे नक्की काय आहे?’ अशीच होती. या ग्रहाचा शोध 2017 मध्ये रेडिओ टेलिस्कोपद्वारे लागला होता. परंतु, जेम्स वेब टेलिस्कोपच्या तीक्ष्ण नजरेमुळेच तिथल्या वातावरणाचा उलगडा होऊ शकला. हा तारा अतिशय उच्च क्षमतेचे गॅमा लहरी उत्सर्जित करतो, ज्या जेम्स वेबला दिसत नाहीत; पण शास्त्रज्ञांच्या मते, हे एक प्रकारचे वरदानच ठरले. कारण, ताऱ्याचा प्रकाश आडवा येत नसल्याने त्यांना या ग्रहाचा अभ्यास अधिक सखोलपणे करता आला. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधक माया बेलेझनाय यांच्या मते, ‘हे एक अद्वितीय तंत्र आहे, जिथे आपण ताऱ्याला न पाहता त्याच्या प्रकाशात चमकणाऱ्या ग्रहाचा सविस्तर अभ्यास करू शकतो.’