Dholkal Ganesh idol | घनदाट जंगलात, 3000 फूट उंचीवर विराजमान आहेत ‘ढोलकल गणेश’ Pudhari File Photo
विश्वसंचार

Dholkal Ganesh idol | घनदाट जंगलात, 3000 फूट उंचीवर विराजमान आहेत ‘ढोलकल गणेश’

पुढारी वृत्तसेवा

दंतेवाडा : शहरांच्या गजबजाटापासून दूर, घनदाट जंगलाच्या आणि उंच पर्वतांच्या कुशीत काही अशी ठिकाणे दडलेली आहेत, जिथे निसर्ग, इतिहास आणि श्रद्धा यांचा अद्भुत संगम पाहायला मिळतो. छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील ढोलकल पर्वताच्या शिखरावर वसलेली भगवान गणेशाची मूर्ती हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. सुमारे 3000 फूट उंचीवर, मोकळ्या आकाशाखाली विराजमान असलेली ही मूर्ती केवळ भाविकांसाठीच नव्हे, तर गिर्यारोहक आणि इतिहासप्रेमींसाठीही एक मोठे आकर्षण ठरली आहे.

ढोलकल पर्वताच्या शिखरावर पोहोचण्याचा मार्ग सोपा नाही. घनदाट जंगलातून, खडकाळ वाटांवरून ट्रेकिंग करत जावे लागते. मात्र, अनेक तासांच्या या आव्हानात्मक प्रवासानंतर जेव्हा भाविक आणि पर्यटक शिखरावर पोहोचतात, तेव्हा समोर दिसणारे द़ृश्य त्यांचे सर्व श्रम नाहीसे करते. ढोलकल पर्वताच्या टोकावर, निसर्गाच्या सान्निध्यात शांतपणे विसावलेली गणेशाची ही प्राचीन मूर्ती पाहून मन थक्क होते.

पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या मते, ग्रॅनाईट दगडापासून बनवलेली ही सुमारे 3 फूट उंच मूर्ती 10व्या किंवा 11व्या शतकातील आहे. ही मूर्ती नागवंशी राजवटीच्या काळात स्थापन केली गेली असावी, असा अंदाज वर्तवला जातो. गणपतीची ही मूर्ती ‘ललितासन’ मुद्रेत बसलेली आहे, जी तिच्या कलात्मक सौंदर्यात भर घालते. इतक्या उंचीवर, इतक्या वर्षांपूर्वी ही अवजड मूर्ती कशी आणली गेली आणि तिची स्थापना कशी केली गेली, हे आजही एक मोठे रहस्य आहे.

या जागेबद्दल एक स्थानिक पौराणिक कथाही प्रचलित आहे. असे मानले जाते की, याच ठिकाणी भगवान परशुराम आणि गणपती यांच्यात युद्ध झाले होते. या युद्धात परशुरामांनी आपल्या परशूने (कुर्‍हाडीने) गणपतीचा एक दात तोडला होता. त्यानंतरच गणपती ‘एकदंत’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्या पर्वतावर ही मूर्ती आहे, त्याचा आकारही काहीसा परशूसारखा दिसतो, असे म्हटले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT