वेलिंग्टन : प्राण्यांना हवामान बदलाच्या दुष्परिणामांपासून वाचवण्यासाठी संशोधकांनी आता जनुकीय सुधारणांचा मार्ग स्वीकारला आहे. त्याचा प्रयोग आता गायींवर करण्यात आला असून अशा जनुकीय सुधारित वासराचा जन्मही झाला आहे. सर्वसाधारणपणे या प्रजातीच्या गायींच्या शरीरावर काळे ठिपके असतात. मात्र, आता जन्मलेल्या जनुकीय सुधारित वासराच्या अंगावर काळ्याऐवजी करड्या रंगाचे ठिपके आहेत. त्यामुळे त्याचे शरीर कमी उष्णता शोषून घेईल. न्यूझीलंडमधील संशोधकांनी हा प्रयोग केला आहे.
हवामान बदलाचा परिणाम वाढला की तापमानही वाढेल असे संशोधकांना वाटते. काळा रंग उष्णता अधिक प्रमाणात शोषून घेतो. त्यामुळे शरीरावर काळे ठिपके असलेल्या गायींना उष्णतेचा अधिक त्रास होऊ शकेल हे जाणून संशोधकांनी त्यांच्या शरीरावरील हे काळे ठिपके जनुकांमध्ये परिवर्तन करून करडे बनवले. हा करडा रंग काळ्या रंगाच्या तुलनेत कमी उष्णता शोषून घेईल. 'जीन एडिटिंग'च्या मदतीने 'डीएनए'मध्ये बदल घडवून आणला जातो. एखाद्या भ्रूणाच्या जनुकांमधील खराब, हानिकारक किंवा निरुपयोगी भाग काढून टाकला जातो. त्यामुळे पुढील पीढीत या जनुकामुळे दिसणारे दुष्परिणाम आढळत नाहीत. या तंत्रामुळे अनुवंशिक आजारही टाळले जातात. संशोधकांनी प्रयोगशाळेत अशा जनुकीय सुधारित दोन वासरांचे भ्रूण विकसित केले होते. त्यांच्यामधील काळ्या ठिपक्यांसाठी जबाबदार असणार्या जनुकाचे ते विशिष्ट भाग जीन एडिटिंगच्या सहाय्याने काढून टाकले होते. हे भ्रूण गायीच्या गर्भात स्थापित करण्यात आले व गायीने या दोन वासरांना जन्म दिला. चार महिन्यांनंतर या दोन्हीपैकी एका वासराचा मृत्यू झाला.