लास वेगास : तंत्रज्ञानाच्या जगात दररोज नवनवीन शोध लागत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, आता आपले रोजचे दात घासण्याचे काम केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता आरोग्याची तपासणी करणारे साधन ठरणार आहे. दुसरीकडे, मोबाईल चार्जिंगसाठी आता कोणत्याही वायरची किंवा चार्जिंग पॅडची गरज उरणार नाही. लास वेगासमध्ये पार पडलेल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये अशी साधने सादर करण्यात आली.
‘वाय-ब्रश’ नावाच्या ओरल केअर स्टार्टअप कंपनीने ‘हेलो’ नावाचा एक स्मार्ट टूथब्रश सादर केला आहे. हा केवळ दात साफ करत नाही, तर एखाद्या हेल्थ मॉनिटरप्रमाणे तुमच्या शरीरातील आजारांचा शोध घेतो. या ब्रशच्या हेडमध्ये विशेष ‘गॅस सेन्सर्स’ बसवण्यात आले आहेत. जेव्हा तुम्ही ब्रश करता, तेव्हा हा ब्रश तुमच्या श्वासातील विशिष्ट संयुगांचे विश्लेषण करतो. यामध्ये असलेल्या ‘स्मार्ट नोज एआय’ तंत्रज्ञानामुळे श्वासाचा वास घेऊन हा ब्रश मधुमेह, यकृत विकार आणि हिरड्यांचे आजार यांसारख्या 300 हून अधिक आरोग्यविषयक समस्यांचे संकेत देऊ शकतो.
कंपनीने अद्याप या ब्रशची किंमत किंवा लाँचिंगची तारीख जाहीर केलेली नाही. या शोधमध्ये ‘हवेतून’ मोबाईल चार्जिंगचेही तंत्र दर्शवण्यात आले. चार्जिंगसाठी मोबाईल एका जागी ठेवण्याचे दिवस आता लवकरच संपणार आहेत. फिनलँडच्या ‘विलो’ या डीप-टेक स्टार्टअप कंपनीने एक विस्मयकारक तंत्रज्ञान सादर केले आहे. या तंत्रज्ञानामुळे तुमचा मोबाईल खिशात असताना किंवा हातात धरलेला असतानाही चार्ज होऊ शकेल. सध्याच्या वायरलेस चार्जिंगमध्ये फोन एका ठराविक पॅडवर ठेवावा लागतो, मात्र ‘विलो’ च्या तंत्रज्ञानात कोणत्याही पॅडची किंवा ठराविक अँगलची गरज नाही. जसा तुमचा डिव्हाईस ‘पॉवर सोर्स’च्या कक्षेत येईल, तसा तो आपोआप चार्ज व्हायला सुरुवात होईल. यामुळे भविष्यात चार्जिंग केबलचा वापर पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे.