वॉशिंग्टन : अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात एका मोठ्या यशाची नोंद झाली आहे. नासाच्या ‘पार्कर सोलर प्रोब’ने दिलेल्या माहितीच्या आधारे शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच सूर्याच्या सर्वात बाहेरील वातावरणाचा, म्हणजेच ‘कोरोना’चा सविस्तर 2-डी नकाशा तयार केला आहे. 2021 पासून सूर्याच्या वातावरणात सातत्याने ये-जा करणार्या या धाडसी मोहिमेमुळे हे शक्य झाले आहे.
पार्कर सोलर प्रोब हे इतिहासातील पहिले असे यान आहे जे एखाद्या तार्याच्या इतक्या जवळ पोहोचले आहे. या यानाला खास ‘हीट शिल्ड’ (उष्णता कवच) बसवण्यात आले आहे, जे सुमारे 1370 अंश सेल्सिअस (2,500 फॅरेनहाईट) पर्यंतचे तापमान सहन करू शकते. विशेष म्हणजे, सूर्याच्या ‘कोरोना’चे तापमान 10 ते 30 लाख अंश फॅरेनहाईटच्या दरम्यान असते. परंतु, हे वातावरण अत्यंत विरळ असल्यामुळे यानाला सुरक्षितपणे तिथून प्रवास करणे शक्य होते.
सूर्याच्या वातावरणाची एक अद़ृश्य सीमा असते, ज्याला ‘अल्फवेन सरफेस’ असे म्हणतात. या सीमेच्या पलीकडे गेल्यावर सौर कण ताशी 16 लाख किलोमीटर वेगाने वाहणार्या सौर वार्याचा भाग बनतात. आतापर्यंत या सीमेचा नेमका आकार आणि स्वरूप एक रहस्य होते. मात्र, पार्कर सोलर प्रोबवरील उपकरणांनी गेल्या 7 वर्षांत जमा केलेल्या माहितीवरून असे सिद्ध झाले आहे की, सूर्याच्या हालचालींनुसार या सीमेचा आकार सतत बदलत असतो.
या संशोधनातून समोर आले आहे की, जेव्हा सूर्य अधिक सक्रिय असतो, तेव्हा ही सीमा अधिक खडबडीत आणि अशांत बनते. ही माहिती केवळ विज्ञानासाठीच नाही, तर पृथ्वीवरील दळणवळण यंत्रणेसाठीही महत्त्वाची आहे. सौर वादळांमुळे जीपीएस आणि रेडिओ लहरींमध्ये अडथळे येतात. शक्तिशाली सौर ज्वाळांमुळे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. या नकाशांच्या मदतीने शास्त्रज्ञ आता सौर वादळांचा अधिक अचूक अंदाज लावू शकतील, ज्यामुळे पृथ्वीवरील तंत्रज्ञान आणि उपकरणांचे संरक्षण करणे सोपे होईल.