Denisovan DNA Immunity | अमेरिकेतील आदिमानवाला ‘डेनिसोव्हन डीएनए’ने दिली रोगप्रतिकारकता! Pudhari File Photo
विश्वसंचार

Denisovan DNA Immunity | अमेरिकेतील आदिमानवाला ‘डेनिसोव्हन डीएनए’ने दिली रोगप्रतिकारकता!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेत पहिल्यांदा पाऊल ठेवणार्‍या मानवाच्या शरीरात केवळ त्यांचाच नव्हे, तर युरेशियातील दोन नामशेष झालेल्या प्राचीन मानवी प्रजातींचा म्हणजे निएंडरथल आणि डेनिसोव्हन्स यांचा डीएनएदेखील होता, असा धक्कादायक खुलासा एका नवीन अभ्यासातून समोर आला आहे. संशोधकांच्या मते, या आनुवंशिक वारशामुळेच आद्य अमेरिकन मानवांना नवीन प्रदेशातील अज्ञात रोगांशी लढण्यास मदत मिळाली असावी.

कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील लोकसंख्या आनुवंशशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे सहलेखक फर्नांडो व्हिलानिया यांनी सांगितले की, ‘आज जिवंत असलेला प्रत्येकजण हा तीन वेगवेगळ्या प्रजाती एकत्र येण्याचा परिणाम आहे.’ या अभ्यासाने मानवी उत्क्रांती आणि स्थलांतराच्या इतिहासावर नवा प्रकाश टाकला आहे. ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या लोकसंख्या आनुवंशशास्त्रज्ञ आणि अभ्यासाच्या सहलेखिका एमिलिया हुएर्टा-सांचेझ यांनी यामागील सिद्धांत अधिक स्पष्ट केला. त्या म्हणाल्या, ‘आम्हाला असे वाटते की, मानवांमध्ये ही प्राचीन आनुवंशिक विविधता आधीपासूनच होती.

जेव्हा या लोकांनी अमेरिकेत प्रवेश केला, तेव्हा त्यांना नवीन रोगजंतूंशी लढण्यासाठी नवीन उत्परिवर्तनाची वाट पाहण्याची गरज भासली नाही. त्याऐवजी, त्यांनी इतर मानवी गटांकडून मिळालेल्या आनुवंशिक प्रकारांच्या शस्त्रागाराचा वापर केला. ‘सायन्स’ (Science) या प्रतिष्ठित जर्नलमध्ये गुरुवारी (21 ऑगस्ट) प्रकाशित झालेल्या या अभ्यासात, संशोधकांनी ‘MUC19’ नावाच्या एका विशिष्ट जनुकाचे विश्लेषण केले. हे जनुक शरीरातील अनेक कार्यांसाठी महत्त्वाचे आहे, ज्यात श्लेष्माची घनता निश्चित करणे याचाही समावेश आहे. या अभ्यासात एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली : आज मेक्सिकोमध्ये राहणार्‍या प्रत्येक 3 पैकी 1 व्यक्तीमध्ये डेनिसोव्हन जनुकासारखेच MUC19 जनुक आढळते.

डेनिसोव्हन्स हे सुमारे 2,00,000 ते 30,000 वर्षांपूर्वी संपूर्ण आशियामध्ये वास्तव्य करून असलेले प्राचीन मानवांचे एक रहस्यमय गट होते. त्यांच्या डीएनएचा अंश आधुनिक मानवांमध्ये, विशेषतः अमेरिकेतील लोकांमध्ये सापडणे, हे हजारो वर्षांपूर्वी झालेल्या आंतरप्रजातीय संबंधांचे आणि स्थलांतराचे थेट पुरावे देते. हा अभ्यास केवळ एका जनुकापुरता मर्यादित नाही, तर तो मानवी स्थलांतर आणि उत्क्रांतीच्या प्रवासावर नवीन प्रकाश टाकतो. यातून असे दिसून येते की, प्राचीन मानवी प्रजातींसोबतच्या संबंधांमुळे आधुनिक मानवाला केवळ जनुकीय विविधताच मिळाली नाही, तर नवीन वातावरणात टिकून राहण्यासाठी एक शक्तिशाली रोगप्रतिकारक शक्तीची देणगीही मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT