विश्वसंचार

कोरोना काळात वाढली शेवग्याची मागणी

Pudhari News

नवी दिल्‍ली : शेवग्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात व त्याचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक ठरते. त्यामुळे सध्याच्या कोरोना काळात शेवग्याची मागणीही वाढली आहे. शेवग्याच्या पानांची भाजी किंवा शेंगा केवळ चवीलाच नव्हे तर आरोग्यासाठीही चांगल्या आहेत. 

कृषी विज्ञान केंद्र आबूसरचे अध्यक्ष व वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. दयानंद यांनी सांगितले की शेवगा हे एक औषधी झाड आहे. शेवग्याची पाने व शेंगा यांच्या सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. कोरोनासारख्या महामारीविरुद्धच्या लढाईमध्ये हे आवश्यक आहे. शेवग्याच्या पानांमध्ये संत्र्यापेक्षा सातपट अधिक 'क' जीवनसत्त्व, दुधापेक्षा तिप्पट अधिक कॅल्शियम, अंड्यापेक्षा 36 पट अधिक मॅग्‍नेशियम, पालकपेक्षा 24 पट अधिक लोह व केळीपेक्षा तिप्पट अधिक पोटॅशियम असते. महाराष्ट्रात जूनमध्ये मृग नक्षत्रावेळी शेवग्याची भाजी खाण्याची प्रथा आहे. मात्र, केवळ त्याचवेळी नव्हे तर नेहमीच अशी भाजी खाणे हितावह ठरते. शेवग्यामुळे पोटाचे अनेक विकारही बरे होण्यास मदत मिळते. कर्करोग व हृदयरोगाच्या रुग्णांसाठीही शेवग्याच्या पानांची भाजी गुणकारी आहे. शेवग्याच्या शेंगाही अशाच औषधी व पोषक घटकांनी संपन्‍न असतात.

SCROLL FOR NEXT