वॉशिंग्टन : अमेरिकेतील डेलावेअर राज्याने पर्यावरणाचे संवर्धन करत एका समस्येचे रूपांतर निसर्गाच्या फायद्यात करून दाखवले आहे. समुद्रातील ज्या मार्गावरून जहाजांची वाहतूक होत होती, तेथे मोठ्या प्रमाणावर खडकांचा अडथळा निर्माण झाला होता. जलवाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी समुद्रातून हजारो टन दगड बाहेर काढावे लागले. हे दगड फेकून देण्याऐवजी त्यांचा वापर अत्यंत योग्य पद्धतीने आणि निसर्गाच्या हितासाठी करण्यात आला. २०१८ मध्ये राबवण्यात आलेल्या या अनोख्या प्रयोगाचे आता अत्यंत सकारात्मक परिणाम समोर आले असून, माशांनी या ठिकाणी आपले हक्काचे घर बनवले आहे.
सुमारे ८ वर्षांपूर्वी अमेरिकेच्या डेलावेअर राज्यामध्ये जहाजांच्या सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीसाठी समुद्रातून तब्बल ९ लाख ९० हजार टन दगड बाहेर आले. या दगडांची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांची दोन कृत्रिम खडक किंवा भित्ती (आर्टिफिशिअल रीफ) तयार करण्यासाठी विभागणी करण्यात आली. पहिली साईट 'बोव्हर्स बीच'च्या दक्षिणेला आणि 'मिसपिलियन इनलेट'च्या उत्तरेला निश्चित करण्यात आली, जिथे सुमारे ३ लाख ५५ हजार टन दगड टाकण्यात आले. तर दुसऱ्या साईटवर उर्वरित ६ लाख ३५ हजार टन दगड टाकून कृत्रिम रीफ तयार केली गेली.
डेलावेअरचा हा रीफ प्रकल्प समुद्रातून काढलेल्या साहित्याचा सागरी जीवसृष्टीच्या संवर्धनासाठी कसा प्रभावी वापर होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण ठरला आहे. यामुळे कचऱ्याची समस्या टळली. जर हे दगड असेच टाकून दिले असते, तर ते वाया गेले असते; मात्र प्रशासनाने त्यांचा पुनर्वापर पूर्णपणे नैसर्गिक अधिवास निर्माण करण्यासाठी केला. ज्या भागांमध्ये नैसर्गिक खडक किंवा रीफ अस्तित्वात नव्हते, अशा ठिकाणी हे दगड टाकून खडकाळ अधिवास तयार करण्यात आला. यामुळे त्या भागात 'ब्लू मसेल्स' (निळ्या रंगाचे शिंपलेयुक्त जीव) आणि इतर अनेक लहान सागरी जीवांची मोठ्या प्रमाणावर पैदास झाली.
परिणामी, येथे माशांना मुबलक अन्न उपलब्ध झाले आणि त्यांनी या परिसराला आपले नवे घर बनवले. थोडक्यात सांगायचे तर, जहाजांच्या मार्गातील अडथळा ठरलेल्या या दगडांचा पुनर्वापर पर्यावरण रक्षण आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत यशस्वी ठरला आहे.