न्यूयॉर्क : तुम्हाला माहीत आहे का की, रोज एक-दोन कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने तुमचे आयुष्य वाढू शकते? होय, एका नवीन संशोधनानुसार, दररोज एक किंवा दोन कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने मृत्यूचा धोका 14 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. हे संशोधन त्या सर्व कॉफी प्रेमींसाठी दिलासादायक आहे, जे आपल्या दिवसाची सुरुवात गरमागरम कॉफीने करतात.
संशोधकांचे मत आहे की, कॉफीमध्ये असलेले जैव-सक्रिय संयुगे (Bioactive Compounds) तिच्या आरोग्य फायद्यांचे मुख्य कारण आहेत. हे एन्झाईम आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. परंतु, येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, हे फायदे पूर्णपणे मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कॉफीमध्ये दूध किंवा साखर घालणे टाळावे लागेल. संशोधनात असे आढळून आले आहे की, जेव्हा कॉफीमध्ये जास्त प्रमाणात साखर आणि दूध मिसळले जाते, तेव्हा तिचे आरोग्य फायदे कमी होतात. म्हणून, जर तुम्हाला तुमच्या कॉफीमधून जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल, तर ती दूध आणि साखरेविना पिण्याचा प्रयत्न करा.
हा अभ्यास ‘द जर्नल ऑफ न्यूट्रिशन’ मध्ये प्रकाशित झाला आहे. यामध्ये अमेरिकेच्या ‘नॅशनल हेल्थ अँड न्यूट्रिशन एक्झामिनेशन सर्वे’ (NHANES) च्या 1999 ते 2018 पर्यंतच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले. या संशोधनात 20 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 46,000 हून अधिक लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी सहभागींना त्यांच्या कॉफीमधील कॅफीनचे प्रमाण, साखर आणि सॅचुरेटेड फॅटच्या आधारावर वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले. परिणामांमध्ये कर्करोग आणि हृदयरोगामुळे होणार्या मृत्यूंचाही समावेश करण्यात आला.