Cyborg Dragonfly | पाठीवर इलेक्ट्रॉनिक उपकरणे असलेली ‘सायबर्ग ड्रॅगनफ्लाय’ 
विश्वसंचार

Cyborg Dragonfly | पाठीवर इलेक्ट्रॉनिक उपकरणे असलेली ‘सायबर्ग ड्रॅगनफ्लाय’

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : जगभरात काही कीटकांना ‘सागबर्ग इन्सेक्टस्‌’ बनवण्यात आले आहे. आधुनिक उपकरणे जोडलेली हे कीटक अनेक गोष्टींसाठी वापरले जातात. कीटकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्युत उत्तेजना प्रभावी ठरली असली, तरी २०१७ मध्ये संशोधकांनी कीटकांच्या मज्जासंस्थेशी संवाद साधण्याचा एक अधिक अचूक मार्ग समोर आणला. अमेरिकेतील ‘ड्रेपर’ या संशोधन व विकास कंपनी आणि ‘हावर्ड ह्युजेस मेडिकल इन्स्टिट्यूट’ यांच्या संयुक्त प्रकल्पातून विकसित केलेल्या ‘ड्रॅगनफ्लाय’ या तंत्रज्ञानामध्ये अनुवंशिक अभियांत्रिकीचा (genetic engineering) वापर करण्यात आला. याद्वारे ड्रॅगनफ्लायच्या मज्जातंतूतील विशिष्ट सुकाणू मज्जातंतूंना प्रकाशासंवेदनशील बनवले गेले. यामुळे संशोधकांना ‘ऑप्ट्रोड’ नावाच्या अत्यंत सूक्ष्म आणि लवचिक ऑप्टिकल उपकरणाद्वारे या मज्जातंतूंना प्रकाशाचे झोत पाठवणे शक्य झाले. कीटकांच्या स्नायूंना थेट उत्तेजित करण्यापेक्षा त्यांच्या उड्डाणावर नियंत्रण ठेवण्याचा हा अधिक प्रभावी मार्ग ठरला.

संशोधकांनी या प्रयोगासाठी ड्रॅगनफ्लाय म्हणजेच हेलिकॉप्टरसारख्या दिसणाऱ्या चतुर नावाच्या किड्याची निवड केली. कारण, ते त्यांच्या लहान आकारानुसार अत्यंत मजबूत, चपळ आणि कार्यक्षम उड्डाण करणारे कीटक आहेत. शिवाय, जगभरात त्यांचा वावर असल्यामुळे विविध पर्यावरणीय परिसंस्थेमधून डेटा गोळा करण्यासाठी आणि पाठवण्यासाठी त्यांचा संभाव्य वापर केला जाऊ शकतो. मात्र, अवघ्या ६०० मिलिग्राम (०.०२ औंस) वजनामुळे त्यांचा आकार हे संशोधकांसमोर एक मोठे आव्हान ठरले.

यामुळे टीमला त्यांच्या पाठीवरील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे वजन प्रचंड प्रमाणात कमी करावे लागले आणि बॅटरीऐवजी ऊर्जा मिळवण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करावा लागला. याचा परिणाम असा झाला की, केवळ रोबोटिक्सच्या माध्यमातून या आकारात तयार करणे अत्यंत कठीण ठरले असते, असा एक ‘सायबर्ग कीटक’ तयार झाला. विशेषतः, जेव्हा ऊर्जा आणि स्थिरतेचा प्रश्न येतो. संशोधक या तंत्रज्ञानाला आणखी लहान कीटकांवर बसवण्यासाठी ते अधिक सूक्ष्म बनवण्याचा विचार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT