विश्वसंचार

‘या’ हॉटेलमध्ये ग्राहकांचा अपमान, तरीही होते गर्दी!

Arun Patil

लंडन : हॉटेलचे एकेक प्रकार अगदी थक्क करणारे असतात. यातील एक हॉटेल असेही आहे, जेथे चक्क ग्राहकांचा अपमान केला जातो. पण, तरीही येथे लोक गर्दी करत असतात.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, इंग्लंडमधील या हॉटेलमध्ये पैसे घेऊनही ग्राहकांशी गैरवर्तन केले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ग्राहक देखील हा अपमान शांतपणे सहन करतात. इथल्या हॉटेल कर्मचार्‍यांना काहीही म्हणणे म्हणजे आणखी अपमान. कर्मचारी त्यांच्या इच्छेने लोकांचा अपमान करत नाहीत, उलट त्यांचा अपमान केल्याबद्दल त्यांना भरभक्कम मोबदलाही मिळतो.

हे हॉटेल बर्नेट, लंडन येथे आहे आणि 'केरेन्स हॉटेल' म्हणून ओळखलं जातं. येथील एका रात्रीचे भाडे सुमारे 20 हजार रुपये आहे. पूर्वी हे हॉटेल रेस्टॉरंट होते; मात्र आता त्याचं हॉटेलमध्ये रूपांतर झाले आहे. येथे येणार्‍या ग्राहकांचा खाण्याबरोबरच अपमान केला जातो. पाहुण्यांनी हॉटेलच्या कर्मचार्‍यांकडून पाणी मागितले तरी त्यांना स्वतः सिंकमधून पाणी घेण्यास सांगितले जाते.

वेटर जेवणाचे ताट ग्राहकांच्या दिशेने फेकतात आणि काहीवेळा अत्यंत उद्धटपणे त्यांच्याकडून अन्न हिसकावून घेतात. येथे येणार्‍यांना टॉवेल, वॉशरूम रोल किंवा मूलभूत सुविधाही दिल्या जात नाहीत. गंमतीची गोष्ट म्हणजे हॉटेलवाले स्वतःला जगातील सर्वात वाईट हॉटेल म्हणून जाहिरात करतात. पण, यानंतरही ग्राहक येथे आवर्जून येतात. या अपमानाबदल्यात ते पैसे देतात. शिवाय, त्याचे मनापासून आभारही मानतात.

SCROLL FOR NEXT