वॉशिंग्टन : जगातील सर्वात महागड्या आणि मौल्यवान वस्तूंच्या यादीत वरचा क्रमांक लागणारा ‘हॉप डायमंड’ आपल्या सौंदर्यापेक्षा त्यासोबत जोडलेल्या ‘शाप’ आणि गूढ कथांमुळे जगाचे लक्ष वेधून घेत असतो. गडद निळ्या रंगाचा हा दुर्मीळ हिरा सध्या अमेरिकेतील ‘स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ नॅशनल हिस्ट्री’मध्ये सुरक्षित असला, तरी त्याचा रक्तरंजित इतिहास आजही अनेकांच्या अंगावर काटा आणतो.
असे मानले जाते की, हा हिरा भारताच्या गोवळकोंडा खाणीतून काढला गेला होता. 45.52 कॅरेटचा हा हिरा 17 व्या शतकात फ्रेंच व्यापारी जीन-बाप्टिस्ट टॅव्हरनियर याने मिळवला. तेव्हापासून या हिर्याचा प्रवास सुरू झाला. फ्रान्सचे राजे लुई चौदावे यांच्यापासून ते मेरी अँटोइनेटपर्यंत हा हिरा अनेकांकडे राहिला. लोककथांनुसार, हा हिरा ज्याच्याकडे गेला, त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. या हिर्याशी संबंधित काही धक्कादायक दावे असे : फ्रेंच क्रांती : फ्रान्सच्या राजघराण्यातील ज्या व्यक्तींकडे हा हिरा होता, त्यांना अत्यंत भीषण मृत्यूला सामोरे जावे लागले. मालकांचे दुर्दैव : या हिर्याचे नंतरचे मालक हेन्री फिलिप हॉप (ज्यांच्या नावावरून याला ‘हॉप’ नाव पडले) आणि त्यांच्या वारसांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.
इव्हलिन वॉल्श मॅकलीन : या हिर्याची शेवटची खासगी मालक इव्हलिन मॅकलीन यांच्या मुलाचा अपघात झाला, मुलीने आत्महत्या केली आणि पतीचे मानसिक संतुलन बिघडले. वैज्ञानिक द़ृष्टिकोनातून पाहिले तर या हिर्याचा निळा रंग त्यात असलेल्या ‘बोरॉन’ या मूलद्रव्यामुळे आहे. तसेच, अतिनील प्रकाशात हा हिरा लाल रंगाचा चमकतो, ज्यामुळे याला अधिक भीतीदायक आणि गूढ स्वरूप प्राप्त होते. संशोधकांच्या मते, या हिर्यासोबत घडलेल्या घटना निव्वळ योगायोग असू शकतात; मात्र लोकांच्या मनातील भीती आजही कायम आहे. 1958 मध्ये प्रसिद्ध हिरे व्यापारी हॅरी विन्स्टन यांनी हा हिरा एका साध्या कागदी पाकिटात घालून टपालाने स्मिथसोनियन संस्थेला दान केला. तेव्हापासून हा हिरा तिथेच आहे आणि दरवर्षी लाखो पर्यटक हे ‘निळे रहस्य’ पाहण्यासाठी गर्दी करतात.