वॉशिंग्टन ः ‘नासा’च्या क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळावरील प्राचीन जीवनाचे काही सर्वोत्कृष्ट पुरावे शोधले असून, हे जीवन नष्ट होण्यामागील संभाव्य कारणाचाही शोध लागल्याचे संकेत मिळाले आहेत. मंगळावरील गेल क्रेटरच्या मध्यभागी असलेल्या माऊंट शार्प पर्वतावर ड्रिलिंग करत असताना, क्युरिऑसिटी रोव्हरने सायडेराईट नावाच्या लोहयुक्त कार्बोनेट खनिजाचे पुरावे मिळवले. या खनिजाच्या अस्तित्वामुळे, मंगळावर एकेकाळी कार्बन सायकल अस्तित्वात होते, असे सूचित होते. त्यामुळे तिथे एकेकाळी जीवसृष्टीस पोषक अशा परिस्थिती होत्या आणि कदाचित जीवनही अस्तित्वात होते, अशी शक्यता निर्माण होते.
हा महत्त्वपूर्ण शोध उपग्रहांच्या स्कॅनमधून लपून गेला होता. मात्र, आता जेव्हा पर्सिव्हरन्स रोव्हरने गोळा केलेले नमुने पृथ्वीवर आणले जातील, तेव्हा मंगळावर प्राचीन जीवन होते का याचे अधिक ठोस पुरावे मिळू शकतात, अशी आशा शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. या संशोधनाचा अहवाल 17 एप्रिल रोजी ‘सायन्स’ या नामवंत वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासाचे प्रमुख लेखक, कॅलगरी विद्यापीठातील भूगर्भ, ऊर्जा व पर्यावरण विभागाचे सहयोगी प्राध्यापक बेन टुटोलो यांनी सांगितले, ‘जेव्हा आम्हाला या खडकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात साइडेराईट आढळले, तेव्हा मी अतिशय आनंदीत झालो. मंगळावरील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे: ‘सर्व कार्बोनेटस् कुठे गेले?’ आणि त्यामुळेच हा शोध किती महत्त्वाचा आहे, हे मला लगेचच कळले.’ पृथ्वीवर गेल्या सुमारे 4 अब्ज वर्षांपासून कार्बन सायकलमुळे वातावरण आणि जीवनाची साखळी टिकून आहे. ज्वालामुखीमधून बाहेर पडणार्या कार्बन डायऑक्साईडचे शोषण महासागरातील कॅल्शियमद्वारे होऊन चुना दगड निर्माण होतो आणि नंतर ते पुन्हा भूगर्भात जाऊन गरम होतो व पुन्हा वातावरणात येतो. मात्र, मंगळावर पूर्वी नद्या आणि सरोवरे असल्याचे पुरावे असूनही, तेथे कार्बोनेटस्चा ठोस पुरावा आढळला नव्हता. 2012 मध्ये मंगळावर उतरलेल्या क्युरिऑसिटी रोव्हरने गेल क्रेटरमधील सुमारे 34 किलोमीटर अंतर पार करत खडकांच्या रचनांचा अभ्यास केला. 2022 आणि 2023 मध्ये त्याने चार ठिकाणी ड्रिलिंग करून खडकांचे नमुने घेतले आणि आपल्या एक्स-रे डिफ्रॅक्टोमीटरच्या साहाय्याने त्यांचा खनिजीय विश्लेषण करून परिणाम पृथ्वीवर पाठवले. टुटोलो आणि त्यांच्या सहकार्यांनी हे विश्लेषण तपासल्यानंतर समजले की या खडकांमध्ये केवळ साइडेराइटचे अंश नाहीत, तर हे खडक त्याने समृद्ध आहेत. काही नमुन्यांमध्ये ते 5 ते 10 टक्के वजनभर साइडेराईट होते. या कार्बोनेटमध्ये अत्यंत पाण्यात विद्राव्य असलेले मॅग्नेशियम सल्फेट सॉल्टस्ही आढळले, जे उपग्रह स्कॅनमधून साइडेराईटचा संकेत लपवत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.