Curiosity rover Mars images | मंगळावर सापडले राक्षसी ‘ड्रॅगन’चे खवले? 
विश्वसंचार

Curiosity rover Mars images | मंगळावर सापडले राक्षसी ‘ड्रॅगन’चे खवले?

‘नासा’च्या रोव्हरने टिपले अजब दगड

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’च्या क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळ ग्रहावरील एका दुर्गम भागात विचित्र आकाराच्या खडकांचे फोटो टिपले आहेत. हे खडक दिसायला एखाद्या महाकाय सरपटणार्‍या प्राण्याच्या किंवा ‘ड्रॅगन’च्या खवल्यांसारखे दिसत असल्याने शास्त्रज्ञांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. मात्र, हे खवले कोणत्याही परग्रहावरील प्राण्याचे नसून, मंगळावर एकेकाळी असलेल्या पाण्याच्या अस्तित्वाचा हा परिणाम असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

‘नासा’चे क्युरिऑसिटी रोव्हर सध्या मंगळावरील ‘गॅल क्रेटर’मधील ‘माऊंट शार्प’ या पर्वताच्या उतारावर प्रवास करत आहे. ‘अँटोफागास्ता’ नावाच्या एका विवराकडे जाताना रोव्हरला हे वैशिष्ट्यपूर्ण खडक आढळले. ‘नासा’ने 14 एप्रिल रोजी याचे कृष्णधवल फोटो प्रसिद्ध केले, तर 15 एप्रिल रोजी जेपीएलचे इंजिनिअर केविन गिल यांनी याचे रंगीत आणि अधिक स्पष्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या खडकांचा आकार मधमाश्यांच्या पोळ्यासारखा किंवा मगरीच्या पाठीवरील खडबडीत खवल्यांसारखा आहे. अशा प्रकारचे हजारो ‘बहुभुज’ खडक तिथे पसरलेले आहेत.

जेपीएलच्या ग्रहशास्त्रज्ञ अ‍ॅबिगेल फ्रेमॅन यांनी सांगितले की, मंगळावर यापूर्वीही अशा आकाराचे खडक दिसले आहेत; पण इतक्या मोठ्या प्रमाणात आणि अशा तीव्र स्वरूपात ते पहिल्यांदाच पाहायला मिळाले आहेत. संशोधक अ‍ॅबिगेल फ्रेमॅन यांनी सांगितले, ‘या ‘हनीकोंब’ रचनेमागे नेमके काय कारण आहे, हे शोधण्यासाठी क्युरिऑसिटीने भरपूर फोटो आणि रासायनिक डेटा गोळा केला आहे. यातून मंगळाच्या हवामानाचा इतिहास उलगडण्यास मदत होईल.’ याच भागात संशोधनादरम्यान क्युरिऑसिटीला यापूर्वी ‘कोळ्याच्या जाळ्यांसारखे’ दिसणारे नागमोडी खडक आणि अंड्यांच्या आकाराचे गोल दगडही सापडले होते. हे सर्व आकार नैसर्गिक भौगोलिक प्रक्रियेतून निर्माण झाले असून, मंगळ एकेकाळी किती सक्रिय होता, याचे हे पुरावे मानले जात आहेत. सध्या क्युरिऑसिटी रोव्हर या ‘ड्रॅगन खवल्यांच्या’ भागातून पुढे सरकत असून, अधिक सखोल तपासणी करत आहे.

खडक असे का दिसतात?

ओल्या चिखलाचे वाळणे : पृथ्वीवर ज्याप्रमाणे ओला चिखल वाळल्यानंतर त्याला भेगा पडतात आणि ठरावीक आकार तयार होतात, तसाच प्रकार मंगळावर कोट्यवधी वर्षांपूर्वी घडला असावा.

बर्फाची हालचाल : मंगळाच्या पृष्ठभागाखाली असलेल्या बर्फाच्या स्फटिकांच्या हालचालीमुळेही जमिनीला असे आकार प्राप्त होऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT