Chhattisgarh | ज्या मगरीला जग घाबरते, तिच्या मृत्यूवर रडले होते संपूर्ण गाव!  
विश्वसंचार

Chhattisgarh | ज्या मगरीला जग घाबरते, तिच्या मृत्यूवर रडले होते संपूर्ण गाव!

आता पाठ्यपुस्तकात शिकवली जाणार ‘गंगाराम’ची कथा

पुढारी वृत्तसेवा

बेमेतरा (छत्तीसगड) : मगर हा असा एक जलचर प्राणी आहे, ज्याला पाहताच लोक भीतीने लांब पळतात. मात्र, छत्तीसगडमधील बेमेतरा जिल्ह्यातील 'बावा मोहतरा' गावातील तलावात राहणाऱ्या एका मगरीवर गावकऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम केले. २०१९ मध्ये जेव्हा या मगरीचा मृत्यू झाला, तेव्हा संपूर्ण गाव शोकाकुल झाले होते आणि गावकऱ्यांनी त्या दिवशी घरांमध्ये चूलही पेटवली नव्हती. आता या अनोख्या मगरीची म्हणजेच ‘गंगाराम'ची भावूक कथा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली जात असून NCERT च्या पुस्तकांमध्ये ती विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहे.

‘गंगाराम’ नावाच्या या मगरीचा आणि बावा मोहतरा गावातील लोकांचा स्नेह अत्यंत अनोखा होता. गावातील तलावात वर्षानुवर्षे राहणारा गंगाराम गावकऱ्यांसाठी हिंस्त्र प्राणी नसून त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग बनला होता. गावातील लोक तलावात आंघोळ करायचे, तरीही गंगारामने कधीही कोणालाही इजा पोहोचवली नाही. २०१९ मध्ये जेव्हा गंगारामचा नैसर्गिक मृत्यू झाला, तेव्हा संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. गंगारामच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी अश्रू ढाळत त्याला अखेरचा निरोप दिला. त्याच्या मृत्यूमुळे त्या दिवशी गावात एकाही घरात अन्न शिजले नाही म्हणजेच चूल पेटली नाही.

गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्याची अंत्ययात्रा काढली आणि विधिवत अंत्यसंस्कार केले. नंतर त्याच्या स्मरणार्थ तलावाकाठी एक स्मारकही उभारण्यात आले. माणूस आणि प्राणी यांच्यातील या अभूतपूर्व प्रेमाची आणि निसर्ग-पर्यावरण संवर्धनाची ही वास्तववादी कथा आता देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. NCERT (नॅशनल कौनन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग) कडून या कथेचा समावेश शालेय पुस्तकात केला जात आहे, जेणेकरून नवीन पिढीला प्राण्यांप्रती दया, आपुलकी आणि सहअस्तित्वाची शिकवण मिळू शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT