केप टाऊन : जगातील सर्वात वेगवान भूचर प्राणी असलेल्या चित्त्याला भविष्यात नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी नामिबियामध्ये एक चित्ता शुक्राणू बँक (चित्ता स्पर्म बँक) तयार करण्यात आली आहे. अमेरिकेच्या प्राणीशास्त्रज्ञ लॉरी मार्कर गेल्या 35 वर्षांपासून नामिबियातील चित्ता संवर्धन निधीमध्ये (चित्ता कंझर्वेशन फंड : सीसीएफ) हे नमुने गोळा करत आहेत.
लॉरी मार्कर यांनी 1990 पासून ही शुक्राणू बँक अर्थात चित्त्यांचे गोठलेले प्राणिसंग्रहालय ( फ्रोझन झू) म्हणून तयार केले आहे. गंभीर परिस्थितीत, जेव्हा चित्त्यांची संख्या खूपच कमी होईल, तेव्हा कृत्रिम प्रजननाद्वारे (आर्टिफिशली रिप्रॉडक्शन) चित्त्यांची प्रजाती वाचवण्यासाठी या शुक्राणूंचा उपयोग केला जाईल. या शुक्राणू बँकेत आतापर्यंत सुमारे 400 हून अधिक चित्त्यांचे नमुने द्रव नायट्रोजनमध्ये अति-कमी तापमानात साठवले गेले आहेत. हे नमुने मुख्यतः जखमी झालेल्या किंवा पकडलेल्या चित्त्यांवर उपचार करताना घेतले जातात. आज जगात सात हजारहून कमी चित्ते जंगलात उरले आहेत. अधिवासाचे नुकसान, मानवांसोबतचा संघर्ष, अवैध प्राणी शिकार आणि व्यापार यामुळे चित्त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
चित्त्यांची संख्या कमी झाल्यामुळे त्यांच्या जनुकीय विविधतेचा (जेनेटिक डायव्हर्सिटी) अभाव आहे. यामुळेच त्यांच्यामध्ये 70-80 टक्के शुक्राणू असामान्य (अॅब्नॉर्मल स्पर्म) असतात. मार्कर यांच्या मते, जनुकीय विविधतेचा अभाव आणि कमी प्रजनन दर यामुळे भविष्यात चित्त्यांना वाचवण्यासाठी शुक्राणू बँक अत्यंत आवश्यक ठरू शकते. पांढर्या गेंड्यासारख्या नामशेष होण्याचा धोका असलेल्या प्रजातींना वाचवण्यासाठी गोठवलेले शुक्राणू (फ्रोझन स्पर्म) वापरण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. तसेच, अमेरिकेत एकदा जवळजवळ नामशेष झालेल्या ब्लॅक-फूटेड फेरेट या प्राण्याचे कृत्रिम प्रजननाने यशस्वी संवर्धन करण्यात आले आहे. शुक्राणू बँक ही चित्त्यांसाठी अंतिम उपाययोजना आहे आणि या प्रयत्नांमुळे जगातील या सर्वात वेगवान भूचर प्राणी असलेल्या चित्त्याला वाचवण्याची आशा निर्माण झाली आहे.