व्हिक्टोरिया (सेशेल्स) : पश्चिम हिंदी महासागरातील सेशेल्स द्वीपसमूहात आढळणार्या आणि आता नामशेष झालेल्या मगरींबद्दल शास्त्रज्ञांनी एक महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. या मगरी आफ्रिकेतील ‘नाईल’ मगरी नसून, त्या खाडीतील किंवा खार्या पाण्यातील मगरी होत्या, असे ‘रॉयल सोसायटी ओपन सायन्स’ या नियतकालिकात 28 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे.
बव्हेरियन स्टेट कलेक्शन्स ऑफ नॅचरल हिस्ट्री येथील सरपटणार्या प्राण्यांचे तज्ज्ञ आणि या अभ्यासाचे सह-लेखक फ्रँक ग्लॉ यांनी सांगितले की, ‘सेशेल्समधील मगरींच्या या पूर्वजांनी हिंदी महासागरातून किमान 3,000 किलोमीटरचा (सुमारे 1,864 मैल) प्रवास करून हा द्वीपसमूह गाठला असावा. कदाचित हा प्रवास त्यापेक्षाही मोठा असू शकतो.’ 250 वर्षांपूर्वीच्या मोहिमेतील नोंदीनुसार, सेशेल्समध्ये एकेकाळी मगरींची मोठी संख्या होती. मात्र, 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा मानवी वस्ती तिथे स्थिरावली, तेव्हा त्यांनी या सर्व मगरींचा नायनाट केला.
आज या मगरींचे केवळ काही अवशेष लंडन, पॅरिस आणि सेशेल्समधील संग्रहालयांत जतन केलेले आहेत. सुरुवातीला पाश्चात्त्य शास्त्रज्ञांना वाटले होते की, या मगरी आफ्रिकेतून आलेल्या ‘नाईल’ मगरी असाव्यात. 1994 मध्ये त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांवरून त्या ‘खाडीतील मगरी’ असाव्यात, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. आता नवीन संशोधक पथकाने आनुवंशिक पुराव्यांच्या आधारे यावर शिक्कामोर्तब केले आहे. शास्त्रज्ञांनी संग्रहालयातील जुन्या कवट्या आणि दातांमधून ‘मायटोकॉन्ड्रियल डीएनए’ गोळा केला.
या ‘डीएनए’ची तुलना सध्याच्या जिवंत मगरींच्या ऊतींच्या नमुन्यांशी करण्यात आली. चाचणीत असे आढळले की, सेशेल्समधील मगरींचे जेनेटिक मार्कर्स हे खाडीतील मगरींशी तंतोतंत जुळतात. या संशोधनामुळे हे सिद्ध झाले आहे की, मानवाने सेशेल्समधील मगरींचा वंश संपवण्यापूर्वी, या प्रजातीचा विस्तार पूर्व ते पश्चिम असा तब्बल 7,500 मैलांपर्यंत (12,000 कि.मी.) पसरलेला होता. आज या मगरी प्रामुख्याने भारत, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पश्चिम पॅसिफिक बेटांवर आढळतात.