विश्वसंचार

दाम्पत्याला बागेत सापडले बॉम्ब शेल्टर!

Arun Patil

लंडन : युरोपने पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाचे मोठे संकट आपल्या भूमीवर झेलले आहे. युद्धाने जी परिस्थिती ओढवते त्याचे प्रतिबिंब त्या काळातील अनेक समकालीन साहित्यांमधून दिसून येते. सध्या रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमासमधील युद्ध सुरू आहे. त्याचा सर्वसामान्य नागरिकांना किती त्रास होत असेल याची कल्पनाच केलेली बरी! युद्धाच्या काळात आकाशातून बॉम्ब वर्षाव होत असताना जीव वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी बंकर्स बांधलेले असतात. महायुद्धाच्या काळातील असे छुपे बंकर अनेक वेळा अपघातानेही समोर येतात. आता ब्रिटनमध्ये एका दाम्पत्याला आपल्या बागेत असेच एक बॉम्ब शेल्टर आढळून आले.

ब्रिटनमधील बेक्स नावाची महिला आणि तिच्या पतीला हे शेल्टर अचानक दिसून आले. ते आपल्या बागेचे नूतनीकरण करत होते. त्यावेळी बागेतील एक स्लॅब हटवण्यात आला. या स्लॅबखाली त्यांना एक भुयार दिसून आले. बेक्सच्या पतीने हिंमत करून या भुयारात जाण्याचे ठरवले. तो आत गेला त्यावेळी हे एक बॉम्ब शेल्टर असल्याचे दिसून आले. या जुनाट शेल्टरमध्ये दोघांना उंदरांची बिळे, काचेच्या बाटल्या आणि मातीची काही जुनी भांडी आढळली. अनेक जुन्या वस्तू तिथे पडलेल्या होत्या आणि कोळ्यांनी जाळीही केली होती. हे महिला आणि मुलांसाठीचे एक शेल्टर होते असे नंतर त्यांना समजले. आता त्यांनी आता विजेची सोय केली आहे. हे एक ऐतिहासिक ठिकाण असल्याने ते जसेच्या तसे ठेवण्याचे त्यांनी ठरवले आहे.

SCROLL FOR NEXT