अंतानानारिवो, मादागास्कर : जगात प्रत्येक देशाची स्वतःची एक वेगळी ओळख आणि संस्कृती आहे. पण, आफ्रिकेच्या दक्षिणेकडील हिंद महासागरात वसलेला मादागास्कर हा बेट-देश या सर्वांपेक्षा वेगळा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण या देशात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, आणि पुरुष असो वा महिला, सर्वजण एकाच प्रकारचे कपडे घालतात. या पारंपरिक पोशाखाला स्थानिक भाषेत ‘लाम्बा’ म्हणतात.
‘लाम्बा’ हा मादागास्करच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. विशेष म्हणजे, हा पोशाख केवळ जिवंतपणीच नाही, तर मृत्यूनंतर व्यक्तीला कफन म्हणूनही ‘लाम्बा’चाच वापर केला जातो. यावरून या पोशाखाचे त्यांच्या जीवनातील महत्त्व दिसून येते.
मादागास्करला त्याच्या लाल रंगाच्या मातीमुळे ‘रेड आयलंड’ म्हणूनही ओळखले जाते. हा देश नैसर्गिकद़ृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे. येथे आढळणार्या सुमारे 75 टक्के वनस्पती आणि प्राणी जगात इतर कोठेही सापडत नाहीत. यामध्ये काटेरी उंदरासारखा दिसणारा ‘टेनरेक्स’आणि रंगीबेरंगी सरड्यांचा समावेश आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असूनही, मादागास्कर आफ्रिकेतील सर्वात गरीब देशांपैकी एक आहे. येथील लोक मालागासी आणि फ्रेंच या दोन प्रमुख भाषा बोलतात. एकीकडे अनोखी संस्कृती आणि दुसरीकडे आर्थिक आव्हानं, अशा परिस्थितीतही मादागास्कर आपली वेगळी ओळख टिकवून आहे. मात्र, येथील अनेक दुर्मीळ जीवजंतू आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, ही एक चिंतेची बाब आहे.