सध्या मध्यपूर्वेत इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर जगातील लष्करी सामर्थ्याबद्दल, विशेषतः हवाई दलाच्या ताकदीबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मजबूत लष्करी ताकद केवळ सैनिकांच्या संख्येवर नाही, तर लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि टेहळणी विमानांच्या ताफ्यावर अवलंबून असते. 2026 च्या ताज्या लष्करी आकडेवारीनुसार, जगातील सर्वात शक्तिशाली टॉप-5 हवाई दलांचा आढावा खालीलप्रमाणे आहे...
अमेरिका : बिनतोड आणि अजेय (एकूण विमाने : 13,043)
हवाई शक्तीच्या बाबतीत अमेरिका जगात अव्वल स्थानी आहे. अमेरिकेचे हवाई दल, नौदल, लष्करी एव्हिएशन आणि मरीन कॉर्प्स यांचा एकत्रित ताफा 13 हजारांहून अधिक विमानांचा आहे. त्यांचे प्रचंड बॉम्बर्स आणि विमानवाहू युद्धनौका कोणत्याही कोपर्यात धाक निर्माण करण्यास सक्षम आहेत. जुनी विमाने मोडीत काढूनही अमेरिकेचा ‘स्टॉक’ आजही जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे.
रशिया : संख्याबळात आजही वरचढ (एकूण विमाने : 4,292)
रशिया अमेरिकेपेक्षा संख्येने मागे असला तरी दुसर्या स्थानावर भक्कमपणे उभा आहे. रशियाची लष्करी रणनीती प्रामुख्याने आपल्या विस्तीर्ण सीमांच्या रक्षणावर केंद्रित आहे. त्यांच्याकडे घातक इंटरसेप्टर विमाने आणि ट्रान्सपोर्ट विमानांचे जबरदस्त मिश्रण आहे, जे कोणत्याही बाह्य संकटाला तोंड देण्यास सक्षम आहे.
चीन : वेगाने वाढणारे आव्हान (एकूण विमाने : 3,309)
चीन आपल्या लष्करी आधुनिकीकरणासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करत आहे. J-20 आणि J-35 सारख्या 5 व्या पिढीतील ‘स्टील्थ फायटर्स’सह चीन आता रशियाला मागे टाकण्याच्या तयारीत आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत्या हवाई ताकदीमुळे सध्या मोठी खळबळ उडाली आहे.
भारत : सामरिक संतुलनात कुशल (एकूण विमाने : 2,229)
जगातील चौथ्या क्रमांकाची हवाई शक्ती म्हणून भारत ओळखला जातो. भारताची हवाई ताकद डोंगर, वाळवंट आणि समुद्र अशा भौगोलिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज आहे. जरी लढाऊ विमानांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली असली, तरी ‘राफेल’ची नवी खेप आणि स्वदेशी ’ ‘AMCA’ (पाचव्या पिढीतील लढाऊ विमान) या प्रकल्पांमुळे भारत आपली ताकद पुन्हा वाढवत आहे.
दक्षिण कोरिया : आधुनिक तंत्रज्ञानाची जोड (एकूण विमाने : 1,592)
दक्षिण कोरियाने आपल्या लष्करामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक विमानांच्या जोरावर हा देश जगातील पाचव्या क्रमांकाची हवाई शक्ती बनला आहे.