वॉशिंग्टन : आपल्या सूर्यमालेबाहेरून आलेल्या ‘3I/ATLAS’ या दुर्मीळ धूमकेतूबद्दल जगभरातील शास्त्रज्ञांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘हा धूमकेतू आपल्याला पृथ्वीबाहेरील जीवसृष्टीबद्दल काही नवीन माहिती शिकवू शकेल का?’ असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यावर खगोलशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, या धूमकेतूचा प्रवास आणि अभ्यास अजून संपलेला नाही; त्यामुळे या संदर्भातील रहस्ये उलगडणे अजून बाकी आहे.
‘3I/ATLAS’ हा आपल्या सूर्यमालेत जन्माला आलेला नसून, तो दुसऱ्या एखाद्या तारामंडळातून प्रवास करत आपल्या सूर्यमालेत आला आहे. अशा प्रकारचा हा केवळ तिसराच आंतरतारकीय ऑब्जेक्ट आढळला आहे. इतर तारामंडळांमधील वातावरण आणि तेथील रासायनिक घटक कसे आहेत, हे जाणून घेण्यासाठी असे धूमकेतू अत्यंत महत्त्वाचे ठरतात. यांच्यामध्ये सेंद्रिय संयुगे किंवा पाण्याचे अंश असण्याची शक्यता असते, जे जीवसृष्टीच्या निर्मितीसाठी आवश्यक मानले जातात. शास्त्रज्ञांच्या मते, हा धूमकेतू जसा जसा सूर्याच्या जवळून किंवा पुढे प्रवास करेल, तसा त्याच्यातील बर्फ आणि वायू बाहेर पडतील.
या वायूंचे आणि प्रकाशाचे विश्लेषण करून इतर ग्रहांच्या किंवा तारामंडळांच्या विश्वात जीवसृष्टीसाठी अनुकूल घटक आहेत का, याचा शोध घेणे शक्य होईल. ‘या धूमकेतूची गोष्ट अजून इथेच संपलेली नाही,’ असे सांगत खगोलशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की, टेलिस्कोपद्वारे याच्यावर सतत बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि भविष्यात याच्या अभ्यासातून ब्रह्मांड आणि पृथ्वीबाहेरील जीवसृष्टीबद्दल धक्कादायक व महत्त्वपूर्ण माहिती समोर येऊ शकते.