जिनिव्हा : स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथून संयुक्त राष्ट्र संघाची संस्था ‘जागतिक अन्न कार्यक्रम’ (WFP) द्वारे ‘सुपर अल निनो’बाबत अत्यंत गंभीर इशारा देण्यात आला आहे. एका शक्तिशाली अल निनोच्या प्रभावामुळे पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत जगातील अतिशय संवेदनशील भागांमधील सुमारे ५ कोटी अतिरिक्त लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचू शकतात, असा धोका संस्थेने व्यक्त केला आहे.
अल निनो ही प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे पाणी असामान्यपणे गरम होण्याची एक गंभीर हवामान प्रक्रिया आहे, ज्यामध्ये समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा २ अंश सेल्सिअसने वाढते. यामुळे जागतिक हवामानात मोठे बदल होऊन भीषण दुष्काळ, पूर आणि विक्रमी उष्णतेची लाट येते, ज्याचा थेट फटका भारताच्या मान्सून आणि कृषी क्षेत्रालाही बसू शकतो. जागतिक अन्न कार्यक्रमाने आपल्या अहवालात नमूद केले आहे की, एक अत्यंत तीव्र अल निनो घटना घडण्याची ८१ टक्के शक्यता आहे. यामध्ये समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान १९८२ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचेल, जे १९५० नंतरचे सर्वात शक्तिशाली संकट ठरू शकते. WFP च्या अन्न सुरक्षा आणि पोषण विश्लेषण विभागाचे संचालक जीन-मार्टिन बॉवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूतकाळात अशा प्रकारच्या अल निनोच्या घटनांमुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर उपासमार झाली आहे.
अल निनोचा फटका बसू शकणाऱ्या ४५ देशांच्या अभ्यासानुसार, गंभीर अन्न आणीबाणीचा सामना करणाऱ्या लोकांची संख्या सुमारे ४.९ कोटींनी वाढून ती २.७४ कोटींपर्यंत पोहोचू शकते. ही संख्या सध्याच्या संकटाच्या तुलनेत २२ टक्क्यांची मोठी वाढ दर्शवते. जागतिक अन्न कार्यक्रमाच्या अहवालानुसार, मध्य अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतील देशांना या संकटाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. मध्य अमेरिकेत अन्न सुरक्षेच्या संकटाचा सामना करणाऱ्या लोकांच्या संख्येत तब्बल ८३ टक्के वाढ होऊ शकते. तसेच दक्षिण आफ्रिकेतील भागात उपासमारीचा धोका ७५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण अमेरिका आणि कॅरिबियन देशांमध्ये १.२ कोटींहून अधिक लोक गंभीर अन्न आणीबाणीच्या चक्रात अडकू शकतात.