Aliens | आपल्या शेजारील ‘सुपर अर्थ’वर आहेत एलियन? 
विश्वसंचार

Aliens | आपल्या शेजारील ‘सुपर अर्थ’वर आहेत एलियन?

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : पृथ्वीपासून अवघ्या २५ प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या एका नव्याने शोधलेल्या ग्रहावर एलियन म्हणजेच परग्रहवासीयांचे अस्तित्व असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. ‘लाईव्ह सायन्स’च्या अहवालानुसार, ‘जीजे ३३७८बी’ नावाच्या या 'सुपर अर्थ'चे वजन पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूपच कमी असल्याचे समोर आले आहे, त्‍यामुळे तिथे जीवसृष्टीसाठी अनुकूल वातावरण असण्याच्या शक्यता कमालीच्या वाढल्या आहेत. हा ग्रह एका 'रेड ड्वार्फ' (तांबडा तारा) ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालत आहे. या ग्रहावर पाणी आणि पृथ्वीसारखे वातावरण असू शकते, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

जेव्हा २०२४ मध्ये या ग्रहाचा शोध लागला, तेव्हा त्याचे वजन पृथ्वीपेक्षा ५ पट जास्त असेल असा अंदाज होता. अशा स्थितीत तो वायूने भरलेला 'मिनी नेपच्यून' असण्याची भीती होती. मात्र, नव्या विश्लेषणानुसार या ग्रहाचे वजन पृथ्वीच्या तुलनेत केवळ २.३ पट जास्त आहे. यामुळे हा ग्रह वायूचा गोळा नसून पृथ्वीसारखाच एक खडकाळ ग्रह असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. हा ग्रह आपल्या ताऱ्याभोवती अवघ्या २१.५ दिवसांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. जरी तो ताऱ्याच्या खूप जवळ असला, तरी हा रेड ड्वार्फ तारा आपल्या सूर्यापेक्षा ९० टक्‍के कमी उष्णता आणि रेडिएशन उत्सर्जित करतो. त्यामुळे हा ग्रह अगदी 'गोल्डीलॉक्स झोन' म्हणजेच अशा ठिकाणी आहे जिथे पाणी न गोठता किंवा न उकळता द्रव रूपात राहू शकते.

वातावरणाचे रहस्य

शास्त्रज्ञांच्या मते, या ग्रहावर पृथ्वीसारख्याच दाबाचे वातावरण असण्याची शक्यता आहे. मात्र, रेड ड्वार्फ ताऱ्यांच्या तीव्र वाऱ्यांमुळे मंगळ ग्रहाप्रमाणे या ग्रहाचेही वातावरण नष्ट झाले आहे का, याचा शोध घेणे अजून बाकी आहे. भविष्यातील मोहिमांसाठी महत्त्वाचा ग्रह विश्वाच्या अथांग पसाऱ्यात २५ प्रकाशवर्षे हे अंतर खगोलशास्त्रीयदृष्ट्या अगदी 'शेजारच्या घरासारखे' मानले जाते. इतक्या जवळ असल्यामुळे भविष्यातील प्रगत दुर्बिणींच्या मदतीने या ग्रहावर जीवसृष्टीचे संकेतआणि ऑक्सिजनचा शोध घेणे शास्त्रज्ञांसाठी अधिक सोपे होणार आहे. जर या ग्रहावर वातावरणाचे अस्तित्व सिद्ध झाले, तर एलियनच्या शोधाच्या यादीत हा ग्रह पहिल्या क्रमांकावर येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT