विश्वसंचार

मंगळावर घर बांधण्यासाठी ‘कॉस्मिक काँक्रिट’!

Arun Patil

लंडन : ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी 'स्टार क्रीट' नावाने एक विशिष्ट सामग्री बनवली आहे जी माती किंवा धूळ, बटाट्यातील स्टार्च आणि चिमुटभर मीठ यापासून बनवली आहे. तिचा वापर मंगळ ग्रहावर घर बांधण्यासाठी काँक्रिटसारखा होऊ शकतो असा त्यांचा दावा आहे.

अंतराळातील खगोलांवर पायाभूत सुविधांची निर्मिती करणे हे खर्चिक काम ठरू शकते. त्यामुळे यासंबंधी अनेक प्रकारचे संशोधन होत असते. मँचेस्टर युनिव्हर्सिटीच्या टीमने काँक्रिटला पर्याय म्हणून या 'स्टारक्रीट'ची निर्मिती केली आहे. त्यांनी मंगळावरील मातीसारखी एक नकली माती बनवली. या मातीमध्ये बटाट्यामधील स्टार्च आणि मीठ मिसळले. ही सामग्री सामान्य काँक्रिटपेक्षा दुप्पटीने मजबूत असल्याचे त्यांना आढळून आले.

पृथ्वीशिवाय अन्यत्र बांधकाम करण्यासाठी ही सामग्री उपयुक्त ठरू शकते. 'ओपन इंजिनिअरिंग' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या 'स्टारक्रीट'ची कम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ 72 मेगापास्कल (एमपीए) होती जी सामान्य काँक्रिटमध्ये आढळणार्‍या 32 एमपीएपेक्षा दुप्पट आहे. चंद्रावरील धुळीपासून बनवलेले स्टारक्रीट 91 एमपीएपेक्षाही अधिक मजबूत आहे.

SCROLL FOR NEXT