विश्वसंचार

लहानांच्या माध्यमातून कोरोना पसरतो वेगाने

Pudhari News

न्यूयॉर्क : लहान मुलांच्या माध्यमातून कोरोना व्हायरस वेगाने पसरतो, असा दावा 'पेडियाट्रिक' नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनात करण्यात आला आहे. या संशोधनातील निष्कर्षानुसार लहान मुले ही कोरोना व्हायरसची अशी संवाहक असतात की, त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. यामुळे कोरोनाच्या सामूहिक  प्रसारात या लहानग्यांची भूमिका अपेक्षेपेक्षाही जास्त असते. हे संशोधन 192 लहान मुलांवर करण्यात आले असून, यातील 49 मुले कोरोना संक्रमित होती.

लहान मुलांच्या माध्यमातून कोरोना व्हायरस पसरतो का? जर पसरत असेल तर त्याचा वेग किती? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सुमारे 192 मुलांवर संशोधन करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे यातील 49 मुले कोरोना पॉझिटिव्ह होती. यातून असे निष्पन्न झाले की, लहानग्यांच्या माध्यमातून कोरोना व्हायरस पसरतो. तसेच ही मुले कोरोनाच्या सामूहिक संसर्गासही जबाबदार ठरतात. यामुळे  बाधित मुलांच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरते.

दरम्यान, अन्य एका संशोधनातील निष्कर्षानुसार स्तनपान केल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या सॅनडियागो स्कूल ऑफ मेडिसिनमधील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. दरम्यान, जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जगभरात सध्या दोन कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर जवळ जवळ आठ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

SCROLL FOR NEXT