Coral-Like Rock Mars | मंगळावर सापडला समुद्रातील प्रवाळासारखा खडक Pudhari File Photo
विश्वसंचार

Coral-Like Rock Mars | मंगळावर सापडला समुद्रातील प्रवाळासारखा खडक

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : पृथ्वीवरील समुद्रात आढळणार्‍या प्रवाळासारखा (Coral) दिसणारा एक विचित्र खडक मंगळावर सापडला आहे. ‘नासा’च्या क्युरिऑसिटी रोव्हरने या खडकाचे फोटो पृथ्वीवर पाठवले असून, ते सध्या सोशल मीडियावर आणि वैज्ञानिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. पहिल्या नजरेत समुद्रातील जीवसृष्टीचा भाग वाटणारा हा खडक प्रत्यक्षात मंगळाच्या बदललेल्या हवामानाचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे.

मंगळावरील गेल क्रेटर परिसरात 24 जुलै रोजी क्युरिऑसिटी रोव्हरला हा खडक सापडला. हा खडक प्रत्यक्षात प्रवाळ नसून, वार्‍यामुळे झिजलेला एक लहान, फिकट रंगाचा खडक आहे. तरीही, त्याचा आकार समुद्रातील प्रवाळाशी इतका मिळताजुळता आहे की, पहिल्यांदा पाहिल्यावर कोणाचाही गोंधळ उडू शकतो. रोव्हरवर लावलेल्या ‘रिमोट मायक्रो इमेजर’ या उच्च-क्षमतेच्या कॅमेर्‍याने याचे कृष्णधवल छायाचित्र घेतले आहे.

‘नासा’ने 4 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या खडकाची रुंदी अंदाजे 1 इंच (2.5 सेंटिमीटर) आहे आणि त्याला नाजूक फांद्या फुटल्यासारखे दिसते. ‘नासा’च्या प्रतिनिधींनी सांगितले की, ‘क्युरिऑसिटीला याआधीही असे अनेक खडक सापडले आहेत, जे प्राचीन काळातील पाणी आणि अब्जावधी वर्षांच्या वार्‍याच्या मार्‍यामुळे तयार झाले आहेत.’ ‘नासा’च्या शास्त्रज्ञांच्या मते, असे खडक अब्जावधी वर्षांपूर्वी तयार झाले, जेव्हा मंगळावर पाणी अस्तित्वात होते. पृथ्वीप्रमाणेच मंगळावरील पाण्यातही अनेक खनिजे विरघळलेली होती. हे पाणी मंगळाच्या खडकांमधील लहान भेगांमध्ये झिरपले.

कालांतराने, या पाण्यातील खनिजे खडकांच्या भेगांमध्ये जमा झाली आणि त्यांचे रूपांतर कठीण शिरांमध्ये झाले. लाखो वर्षांच्या वार्‍याच्या मार्‍यामुळे आजूबाजूचा मऊ खडक झिजून गेला; पण या कठीण खनिज शिरा मात्र तशाच राहिल्या. त्यामुळेच आज आपल्याला हा प्रवाळासारखा दिसणारा आकार पाहायला मिळत आहे. मंगळावर अशाप्रकारच्या विचित्र आकाराच्या वस्तू सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही क्युरिऑसिटी रोव्हरने अनेक मनोरंजक शोध लावले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT