Baby Sleeping Pose | कूल बेबी... जन्मतःच डोक्यामागे ठेवले हात अन् पायावर पाय! 
विश्वसंचार

Baby Sleeping Pose | कूल बेबी... जन्मतःच डोक्यामागे ठेवले हात अन् पायावर पाय!

पुढारी वृत्तसेवा

कैरो : जन्मानंतर लगेचच नवजात बाळ रडताना दिसणे अगदी स्वाभाविक मानले जाते. अगदी कोणी नवजात बाळाची कल्पना करायला सांगितली, तरी डोळ्यांसमोर रडणाऱ्या बाळाचीच प्रतिमा उभी राहते. मात्र, इजिप्तच्या कैरो शहरातून समोर आलेल्या एका अनोख्या व्हिडीओने ही पारंपरिक प्रतिमा पूर्णपणे बदलून टाकली आहे. जन्मानंतर जगाची अजिबात तमा न बाळगता अत्यंत आरामात झोपलेल्या या नवजात बाळाच्या व्हिडीओने सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. व्हिडीओमध्ये हे बाळ डोक्यामागे दोन्ही हात ठेवून आणि एका पायावर दुसरा पाय टाकून आरामात झोपलेले दिसत आहे. त्याची ही निवांत मुद्रा पाहून जणू काही ते एखाद्या आलिशान सोफ्यावर पडून सुट्टीचा आनंद घेत असल्याचा भास होतो.

बाळाची हीच अनोखी लकब पाहून नेटकऱ्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला असून, विविध प्रकारच्या मजेदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कैरो येथील बालरोगतज्ज्ञ आणि नवजात शिशू संगोपन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. इस्लाम एलदेह यांनी हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी या बाळाचा उल्लेख ‘बेबी किंग’ असा केला. जन्मतःच बाळाचे अशा प्रकारे डोक्यामागे हात बांधून आणि पायावर पाय टाकून झोपणे आता जगभरात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरले आहे. बाळाचा शांत स्वभाव आणि त्याची झोपण्याची ही अनोखी ढब लोकांना भुरळ घालत आहे.

जणू काही जगात पाऊल ठेवताच हे बाळ आरामाच्या मूडमध्ये आले असल्याचे चित्र यातून दिसते. बाळाच्या या मजेशीर मुद्रेवर नेटकऱ्यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीशी तुलना करत अनेक विनोदी टिप्पण्या केल्या आहेत. एका युझरने लिहिले की, ‘‘नव्या पिढीतील या बाळाने जन्मतःच कामाचा ताण आणि आयुष्य यात कसा समतोल साधायचा हे शिकून घेतले आहे.’’ दुसऱ्या एकाने लिहिले, ‘‘याला ना कामाची चिंता आहे, ना कसला ताण; याला फक्त आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे.’’ काहींनी या मुद्रेची तुलना थेट कॅमेरासमोर पोझ देण्याशी केली. एका युझरने मिश्किलपणे म्हटले की, ‘‘कदाचित आपला व्हिडीओ बनवला जात असल्याचे बाळाच्या लक्षात आले असावे, म्हणूनच त्याने कॅमेऱ्यासमोर अशी भारी पोझ दिली आहे.’’ बाळाचे हे निवांत झोपणे पाहून लोक जरी त्याला बेफिकीरपणाशी जोडत असले, तरी वैद्यकीय दृष्टिकोनातून नवजात बाळाच्या मुद्रेवरून किंवा चेहऱ्यावरील हावभावांवरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा किंवा विचारांचा अंदाज लावता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT