सिडनी : घड्याळ चुकीचे वाचल्यामुळे जसा आपला गोंधळ उडतो, तसाच काहीसा प्रकार भूगर्भशास्त्रज्ञांसोबतही होऊ शकतो. खडकांच्या सहाय्याने पृथ्वीचा साडेचार अब्ज वर्षांचा इतिहास उलगडणे हे एक अत्यंत गुंतागुंतीचे काम आहे आणि याचेच एक उत्तम उदाहरण सध्या समोर आले आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या दुर्गम पिलबारा प्रदेशात सापडलेल्या एका उल्का विवराच्या वयावरून दोन संशोधक गटांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे.
काही काळापूर्वी, एका संशोधक गटाने दावा केला होता की, पिलबारा प्रदेशातील ‘नॉर्थ पोल डोम’ परिसरात सापडलेले उल्का विवर तब्बल 3.5 अब्ज वर्षे जुने आहे. जर हा दावा खरा ठरला असता, तर ते पृथ्वीवरील आतापर्यंतचे सर्वात जुने उल्का विवर ठरले असते. या शोधामुळे जगभरात मोठी चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता याच जागेवर संशोधन करणार्या दुसर्या एका गटाने आपले निष्कर्ष ‘सायन्स अॅडव्हान्सेस’ या जर्नलमध्ये प्रकाशित केले आहेत. त्यांच्या मते, हे विवर 3.5 अब्ज वर्षे जुने नसून, ते 2.7 अब्ज वर्षांपूर्वीच्या काळात, म्हणजेच आधीच्या दाव्यापेक्षा तब्बल 80 कोटी वर्षांनी नवीन आहे. इतकेच नाही, तर पहिल्या गटाने या विवराचा व्यास 100 किलोमीटरपेक्षा जास्त असल्याचा दावा केला होता, तर नवीन अभ्यासानुसार त्याचा व्यास केवळ 16 किलोमीटर इतकाच आहे.
पहिल्या अभ्यासात असे म्हटले होते की, या महाकाय उल्कापातामुळे पिलबारा प्रदेशात खंडाच्या कवचाची निर्मिती होण्यास आणि अगदी सुरुवातीच्या जीवसृष्टीच्या विकासावरही प्रभाव पडला असावा. परंतु, नवीन अभ्यासाने हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांच्या मते, ‘हा उल्कापात खंड निर्मितीवर किंवा जीवसृष्टीवर प्रभाव टाकण्यासाठी खूपच नवीन आणि आकाराने खूपच लहान होता.’ विशेष म्हणजे, दोन्ही गट एका गोष्टीवर सहमत आहेत...हे ठिकाण उल्कापाताचेच आहे. याचे कारण म्हणजे तिथे सापडलेल्या ‘शॅटर कोन्स’.
हे ‘शॅटर कोन्स’ म्हणजे उल्कापाताच्या प्रचंड दाबामुळे खडकांवर तयार झालेल्या शंकूच्या आकाराच्या वैशिष्ट्यपूर्ण खुणा असतात, ज्या उल्कापाताचा ठोस पुरावा मानल्या जातात. या नवीन विवराला स्थानिक ‘न्यामल’ आदिवासी लोकांशी सल्लामसलत करून ‘मिराल्गा’ हे पारंपरिक नाव देण्यात आले आहे. सध्या पृथ्वीवरील सर्वात जुने ज्ञात उल्का विवर हे ऑस्ट्रेलियातीलच 2.23 अब्ज वर्षे जुने ‘याराबुब्बा’ विवर आहे. ‘मिराल्गा’ विवराच्या वयावरील हा वाद भूगर्भशास्त्रातील आव्हाने आणि पृथ्वीचा प्राचीन इतिहास समजून घेण्यातील गुंतागुंत पुन्हा एकदा अधोरेखित करतो.