Sinus Symptom | सतत बंद नाक आणि डोकेदुखी असू शकते सायनसचे लक्षण Pudhari File Photo
विश्वसंचार

Sinus Symptom | सतत बंद नाक आणि डोकेदुखी असू शकते सायनसचे लक्षण

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात लोकांना अनेकदा नाक बंद होणे, डोकेदुखी आणि चेहर्‍यावर जडपणा जाणवतो. बरेच लोक याला सामान्य सर्दी किंवा अ‍ॅलर्जी समजून दुर्लक्ष करतात; पण ही समस्या सायनुसायटिस (Sinusitis) असू शकते. सायनस म्हणजे डोक्यातील, डोळे आणि नाकाभोवती असलेल्या पोकळ जागा (गुहा), ज्या बलगम तयार करून नाक स्वच्छ आणि ओलसर ठेवतात. जेव्हा या पोकळ्यांमध्ये सूज येते किंवा संसर्ग होतो, तेव्हा त्या स्थितीला सायनुसायटिस म्हणतात. या रोगाची लक्षणे संसर्ग झालेल्या जागेनुसार वेगवेगळी असू शकतात. सायनुसायटिस ही तात्पुरती समस्या नसून, रोगप्रतिकारशक्ती आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी संबंधित एक आजार आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

उदाहरणार्थ : मॅक्सिलरी सायनसमध्ये सूज असल्यास, गाल आणि वरच्या दातांमध्ये वेदना होतात. फ्रंटल सायनसमध्ये त्रास झाल्यास, कपाळ व माथा दुखतो. एथमॉईड सायनसमध्ये डोळ्यांच्या मध्ये वेदना होतात. स्फेनॉईड सायनसमध्ये डोक्याच्या आणि मानेच्या मागच्या भागात वेदना होतात. याव्यतिरिक्त, नाक सतत बंद राहणे, वास घेण्याची क्षमता कमी होणे, डोकेदुखी, डोळ्यांभोवती दाब जाणवणे, चेहर्‍यावर जडपणा आणि कधी कधी ताप येणे हीदेखील या सायनसची प्रमुख लक्षणे आहेत.

धुळीचे कण, धूर, परागकण किंवा परफ्यूम यांसारख्या वस्तूंमुळे होणारी अ‍ॅलर्जी हे सायनसचे एक मोठे कारण आहे. याशिवाय, नाकाचे हाड वाकडे असणे, विषाणू , जिवाणू किंवा बुरशीजन्य संसर्ग तसेच कमकुवत रोगप्रतिकारशक्ती यामुळेही सायनसची समस्या उद्भवते. तणाव आणि असंतुलित जीवनशैली या रोगाला अधिक वाढवतात.

आयुर्वेदात सायनुसायटिसपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय

नस्य उपचार : सकाळी आणि संध्याकाळी मोहरीचे तेल किंवा तुपाचे दोन-दोन थेंब नाकात टाकल्याने फायदा होतो.

वाफ घेणे : पाण्यात ओवा किंवा पुदिना टाकून त्याची वाफ घेतल्यास आराम मिळतो.

पेय : तुळस आणि आल्याचा काढा पिणे, हळदीचे दूध घेणे आणि त्रिकटू चुर्णाचे सेवन केल्यास कफ कमी होऊन संसर्ग घटतो. तज्ज्ञ सांगतात की, तळलेले आणि जड पदार्थ टाळून हलका, पौष्टिक आणि सहज पचणारा आहार घेणे सायनसच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी काही काळजी घेणे आवश्यक आहे. धूळ, धूर आणि प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण करा. ऋतुमानानुसार शरीर झाकून ठेवा आणि थंड पेये किंवा शिळे अन्न खाणे टाळा. नियमित योगासने आणि प्राणायाम केल्याने श्वसनसंस्था मजबूत होते आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT