Mother’s Day carnation flower meaning | ‘मदर्स डे’ आणि ‘कार्नेशन’ फुलांचे नाते काय?  
विश्वसंचार

Mother’s Day carnation flower meaning | ‘मदर्स डे’ आणि ‘कार्नेशन’ फुलांचे नाते काय?

एका परंपरेचा रंजक इतिहास

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : दरवर्षी मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी जगभरात वर्ल्ड मदर्स डे (जागतिक मातृदिन) साजरा केला जातो. या दिवशी आईला शुभेच्छा देण्यासाठी कार्नेशन फुलांचा वापर करण्याची एक जुनी परंपरा आहे. या परंपरेची सुरुवात या दिनाच्या संस्थापिका अ‍ॅना जार्विस यांनी केली होती; परंतु नंतर त्यांनीच या व्यापारीकरणाला विरोधही केला होता.

परंपरेची सुरुवात कशी झाली?

1908 मध्ये अ‍ॅना जार्विस यांनी त्यांच्या निधन झालेल्या आईच्या (अ‍ॅन रीव्हज जार्विस) स्मृतिप्रत्यर्थ पहिला अधिकृत मदर्स डे साजरा केला. वेस्ट व्हर्जिनियातील एका चर्चमध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी त्यांनी 500 पांढरी कार्नेशन फुले पाठवली होती. कार्नेशन हे त्यांच्या आईचे अत्यंत आवडते फूल होते, त्यामुळे त्यांनी या फुलाची निवड केली.

कार्नेशन फुलांचे महत्त्व आणि प्रतीके

1927 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत अ‍ॅना जार्विस यांनी या फुलाचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट केले होते. पांढरे कार्नेशन फूल हे आईच्या प्रेमातील सत्य, शुद्धता आणि दातृत्वाचे प्रतीक आहे. आईच्या आठवणी आणि तिच्या प्रार्थनेच्या सुगंधाचे प्रतीक हे फूल आहे. कार्नेशनची पाकळी कोमेजत असतानाही गळून पडत नाही, तर ती फुलाच्या हृदयाशी घट्ट धरून राहते. त्याचप्रमाणे आई आपल्या मुलांना आयुष्यभर हृदयाशी घट्ट धरून ठेवते, हे अ‍ॅना यांनी अधोरेखित केले होते.

कार्नेशन फुलांच्या रंगांचा अर्थ :

काळाप्रमाणे या परंपरेत रंगांचे महत्त्वही बदलले

पांढरे कार्नेशन : ज्यांच्या माता हयात नाहीत, त्यांच्या स्मरणार्थ वापरले जाते.

गुलाबी कार्नेशन : हयात असलेल्या मातांच्या सन्मानार्थ आणि प्रेमाप्रीत्यर्थ दिले जाते.

लाल कार्नेशन : प्रेम आणि आदराचे प्रतीक मानले जाते.

व्यापारीकरणाला विरोध

1914 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी अधिकृतपणे मदर्स डे जाहीर केला. त्यानंतर कार्नेशन फुलांची मागणी इतकी वाढली की त्यांच्या किमती गगनाला भिडल्या. अ‍ॅना जार्विस यांना हे व्यापारीकरण आवडले नाही. त्यांनी फुल विक्रेते आणि नफेखोर लोकांना चाचे आणि दरोडेखोर संबोधले. 1920 पर्यंत त्यांनी लोकांना फुले खरेदी न करण्याचे आवाहनही केले होते. आज अ‍ॅना जार्विस यांनी सुरू केलेला हा दिवस जागतिक स्तरावर साजरा होतो आणि अ‍ॅना यांचा विरोध असूनही, कार्नेशन आजही मदर्स डेचे अधिकृत आणि सर्वाधिक लोकप्रिय फूल मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT